आम आदमी पक्षाची मागणी पुणे :महापालिकेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांत मोठ्या प्रमाणात त्रुटी असून अनेक नागरिकांची नावे चुकीच्या प्रभागात नोंदवली आहेत. त्यामुळे हजारो मतदार मतापासून वंचित राहण्याची शक्यता झाली आहे. अंतिम यादी प्रसिध्दीला एक महिन्याची मुदत द्यावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे निवेदनाद्वारे केली. बेनकर यांनी सांगितले की, प्रभाग क्रमांक ३४ सह अनेक प्रभागांतील याद्या हजारो पृष्ठांच्या असल्याने नाव शोधणे अत्यंत कठीण होत आहे. प्रभाग ३४ मधील अनेक मतदारांची नावे चुकीने प्रभाग ३३ मध्ये टाकण्यात आली आहेत. त्रुटींच्या मोठ्या प्रमाणामुळे हरकतींसाठी दिलेले आठ दिवस अपुरे ठरत आहेत. हरकत नोंदवताना ओळखपत्र जोडणे, तांत्रिक अडचणी, तसेच अधिकारी किरकोळ चुका काढून अर्ज नाकारणे या कारणांमुळे नागरिकांना अडचणी येत आहेत. काही मतदारांची नावे जाणूनबुजून पसंतीच्या उमेदवार असलेल्या वॉर्डात टाकल्याच्या तक्रारी असून, अशा प्रकरणांची निवडणूक आयोगाने स्वतःहून पडताळणी करावी, अशीही मागणी बेनकर यांनी केली. आयोगावर टिका राज्यातील काही नगरपरिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका मतदानाच्या उंबरठ्यावर असताना पुढे ढकलण्यात आल्याने निवडणूक आयोग विनोदाचा विषय बनला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ता सुनील माने यांनी केली. माने म्हणाले की ‘एक देश, एक निवडणूक’ची चर्चा करणारे केंद्र सरकार आणि आयोग प्रत्यक्षात निवडणुका अखेरच्या क्षणी पुढे ढकलत आहेत. या कामकाजामुळे जनतेचा आयोगावरचा विश्वास कमी होत असून आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थित आणि व्यावसायिक पद्धतीने घ्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.