पुणे – आगामी महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या “अपडेट’ अर्थात अद्ययावत करण्याचे काम सुरू झाले आहे. यादीमध्ये मतदाराच्या छायाचित्राचा समावेश करण्यासाठी निवडणूक कार्यालयाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये नवमतदारांची नावे समाविष्ट करणे, पत्ता बदल, मतदार यादीतील चुकांची दुरुस्तीही यात केली जाणार आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दि.1 जानेवारी 2022 ची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यासाठी मतदार छायाचित्रे व चुकांच्या दुरुस्तीसह ओळखपत्रे देण्याचे काम शंभर टक्के पूर्ण करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.
यादीत छायाचित्र नसलेल्या मतदाराने आपल्या विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयामध्ये अथवा बीएलओ यांच्याकडे छायाचित्र जमा करावे, असे आवाहन निवडणुक शाखेकडून करण्यात आले आहे. निवडणूक ओळखपत्रातील नाव, पत्ता, मयत नाव वगळणे, मतदार यादीतून नाव स्थलांतरित करणे आदी कामे या मोहिमेंतर्गत करण्यात येणार आहे.
ऍपद्वारेही करा बदल
मतदार यादी अद्यावत करण्याची मोहीम दि.31 ऑक्टोबर 2021 पर्यंत राबवली जाणार आहे. त्यानंतर प्रारुप मतदार यादी दि. 1 नोव्हेबर 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. केंदीय निवडणूक आयोगाकडून मतदारांसाठी वोटर हेल्पलाइन ऍप विकसित करण्यात आलेले आहे. हे ऍप मतदारांना गुगल स्टोअरमधून डाऊनलोड करता येणार आहे. याद्वारे नागरिकांना मतदार यादीमध्ये नाव नोंदविणे, चुकांची दुरुस्ती करता येणार असल्याचे निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.