Pune: रेशनिंग दुकानातून आचारसंहितेचा भंग

पुणे – विधानसभा निवडणूक २०२४ साठी आचारसंहिता लागू झाली आहे. सध्या रेशनिंग दुकानातून शिधापत्रिकाधारकांना दिवाळीचा गोड शिधा वाटप चालू आहे. हा शिधा देण्यासाठी ज्या पिशव्या वापरण्यात आल्या आहेत, त्या पिशव्यांवर पंतप्रधान, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे फोटो छापलेले आहेत.
अशी अशी जाहिरातबाजी करून आचारसंहितेचा भंग केला जात आहे, अशी तक्रार पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकारी सुहास दिवसे यांच्याकडे केली आहे.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार रवींद्र धंगेकर, प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड, माजी महापौर कमल व्यवहारे, उपाध्यक्ष अजित दरेकर, संजय बालगुडे, मुख्तार शेख, ब्लॉक अध्यक्ष सुजित यादव, राजू ठोंबरे व मुकेश धीवार आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.
काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. यादरम्यान रेशनिंग दुकानातून गोड शिधा वाटपाच्या पिशव्यांवर छापण्यात आलेले फोटो व त्यांची जाहिरात या विषयांवर चर्चा करण्यात आली. रेशनिंग दुकानदारांना त्वरित आदेश हा प्रकार थांबवावा व जाहिरात केल्याप्रकरणी आचारसंहिता भंग केल्याबाबत संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.





