पुणे – महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली विकासकामे, तसेच प्रभागाच्या विकासासाठी नगरसेविका म्हणून अर्चना तुषार पाटील आणि तुषार पाटील यांनी केलेली विकासकामांच्या जोरावर अर्चना पाटील यांच्यासह भाजपचे सर्व उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होतील, असा विश्वास माजी राज्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप कांबळे यांनी व्यक्त केला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ (काशेवाडी, डायस प्लॉट) येथील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार अर्चना पाटील यांच्या निवडणूक कचेरीचे उद्घाटन कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. दिनेश रासकर, अर्चना पाटील यांचे वडील उत्तमराव जाधव, तुषार पाटील यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्या भाजपच्या सर्व उमेदवारांसाठी मध्यवर्ती कार्यालय असणार असून, प्रचाराचे नियोजन, बैठका, जनसंपर्क, तसेच निवडणूक रणनीती आखली जाणार आहे. त्यामुळे प्रभागातील संघटनात्मक कामकाज चालणर आहे. या वेळी उपस्थितांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत निवडणूक रणनीती, प्रचाराची दिशा, तसेच विकासकामे घरोघरी जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याच्या सूचना केल्या.