Pune : वनाज-चांदणी चौक दुमजली उड्डाणपूल करावा; खासदार मोहोळ यांच्या महामेट्रो, महापालिकेस सूचना

पुणे : वनाज ते चांदणी चौक मार्गावर वाहतूक कोंडीचा विषय गंभीर बनला आहे, ही बाब लक्षात घेऊन या मार्गावर वनाज ते चांदणी चौक हा विस्तारित मेट्रो मार्ग साकारताना तो नळस्टॉप येथे दुमजली उड्डाणपुलाच्या धर्तीवर दुमजली करावा, अशा सूचना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डिकर तसेच महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांना केल्या आहेत. तसेच, महानगरपालिकेने खराडी ते पुणे विमानतळ या मेट्रो विस्तारासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करावा, अशा सूचनाही मोहोळ यांनी केल्या आहेत.
खराडी आणि परिसर हा झपाट्याने विकसित होत आहे. खराडी येथे हे मल्टीमाॅडल हब झाल्यास पुणे विमातळावर जाण्यासाठी मेट्रोच्या सर्व मार्गांचा पर्याय उपलब्ध होईल. चांदणी चौक ते वाघोली मार्गावरील प्रवाशांना खराडी येथून थेट विमानतळ गाठता येईल. तर निगडी ते स्वागरेट या मार्गावरील प्रवाशांना स्वारगेटहून थेट विमानतळाकडे जाता येईल. तसेच शिवाजीनगर-खराडी-विमानतळ हा पर्याय उपलब्ध असेल. त्यामुळे खराडी हब होणे फायदेशीर असल्याचे मोहोळ यांनी नमूद केले आहे.
यासोबतच कात्रज- चांदणी चौक ते हिंजवडी या मार्गावर मेट्रोचा विचार करावा, असे सूचित केले आहे. या दोन्ही दरम्यानच्या भागात होणारा विकास, सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची गरज आणि भविष्याचे नियोजन या बाबींचा विचार करुन हा मार्ग होणे आवश्यक आहे. हा मार्ग झाल्यास पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांसाठी मेट्रोचे वर्तुळाकार मार्ग होऊ शकणार असल्याचे मोहोळ यांनी नमूद केले आहे.





