Pune : शहरासह जिल्ह्यात अवकाळी बरसला

पुणे : आकाशात काळे ढग भरून आले आणि क्षणात ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह शहरासह उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. तासभर पडलेल्या अवकाळी पावसाने रस्ते जलमय झाले आणि ठिकठिकाणी पाणी साचल्याने पुणे महापालिकेच्या कामकाजाची पोलखोल झाली. चिंचवड येथे सर्वाधिक ६८ मिमी पावसाची नोंद झाली. तर पाषाण परिसरात २८ मिमी पाऊस झाला.
पुणे शहर आणि जिल्ह्यात आज (दि. २०) पुणे वेधशाळेने ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यामुळे दुपारनंतर मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असल्याने पुणेकर अलर्ट झाले होते. सकाळपासून शहरात ऊन आणि ढगाळ वातावरणाचा लपंडाच सुरू असल्याने पाऊस हुलकावणी देणार असे वाटत असताना, दुपारी तीननंतर आकाशात काळे ढग भरून आले आणि चिंचवड, औंध, पाषाण, चांदणी चौक, कर्वेनगर, वारजे, वडगावशेरी, शिवाजीनगर, हडपसर या परिसरात जोरदार पावसाला सुरवात झाली.
अवकाळी पावसाने शहरात येरवडा, कोरेगाव पार्क, धानोरी, एरंडवणा, देवाची उरूळी, बावधन, मुकुंदनगर परिसरात झाडपडीच्या घटना घडल्या. तर जोरदार पावसामुळे रस्त्यावर मोठ्याप्रमाणात पाणी साचल्यामुळे सोसायटी आणि दुकानांमध्ये पाणी घुसल्याच्या घटनाही समोर आल्या. दरम्यान, शहरासह जिल्ह्यात पुढील दोन दिवस आकाश निरभ्र तर दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील. सायंकाळी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
शहरासह जिल्ह्यात आज दिवसभरात झालेला पाऊस
चिंचवड ६८, डुडुळगाव ४४, लवळे ३०, पाषाण २८, तळेगांव ढमढेरे २२, गिरीवन २१, हवेली २०, हडपसर १८, तळेगाव १४, लवासा १३, वडगांवशेरी १२, कुरवंडे ८, शिवाजीनगर ८, पुरंदर आणि कोरेगांव पार्क ३, एनडीए, दौंड, मगरपट्टा आणि भोर प्रत्येकी १ मिमी पावसाची नोंद झाली.




