Pune Unseasonal Rain: शहरात झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे विविध भागांत झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये एकूण १४ ठिकाणी झाडे पडल्याने नागरिकांमध्ये काही काळ घबराट पसरली. काही ठिकाणी उभ्या वाहनांचे नुकसान झाले, तर अनेक भागांत वाहतूक विस्कळीत झाली होती. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, प्रभात रोड, बाणेर गावठाण, सदाशिव पेठ आणि खडक पोलीस लाईन परिसरात झाडे कोसळली. गोखलेनगर आणि ताडीवाला रोड येथे प्रत्येकी दोन झाडे पडल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. याशिवाय बाणेरमधील गणराज चौक तसेच येरवडा येथील सादलबाबा चौकात झाड थेट उभ्या वाहनांवर कोसळल्याने वाहनांचे नुकसान झाले. सोमवार पेठ आणि शिवाजीनगरमधील साखर संकुल (फल उत्पादन कार्यालय) परिसरातही झाड पडल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या. बाणेर गावातील ओमकार मंडळाजवळ तसेच सोमवार पेठेतील जिल्हा परिषद कार्यालयाजवळ झाड पडल्याने काही काळ रस्ते बंद ठेवावे लागले. कोरेगाव पार्क आणि मगरपट्टा परिसरातील नोबल हॉस्पिटलसमोरही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, पावसामुळे झाडांच्या मुळ्या कमकुवत झाल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे सांगितले जात आहे. अग्निशमन दल आणि महापालिकेच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत झाडे हटवून वाहतूक सुरळीत केली.