पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 15 जून 2025 रोजी घेतलेल्या चाळीसाव्या सेट परीक्षेचा निकाल 30 ऑगस्टपर्यंत जाहीर करण्याचे लेखी आश्वासन विद्यापीठाने दिले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनानंतर विद्यापीठ प्रशासनाने ही घोषणा केली. दोन महिन्यांहून अधिक काळ निकाल रखडल्याने 90,000 हून अधिक उमेदवारांच्या शैक्षणिक भवितव्यासमोर अनिश्चितता निर्माण झाली होती. सहायक प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असलेल्या या परीक्षेच्या निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी अभाविपने आज विद्यापीठाच्या सेट परीक्षा भवनसमोर आंदोलन केले. आंदोलनादरम्यान विद्यापीठाच्या कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे आणि सेट परीक्षा संचालक प्रा. कापडणीस यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या. अखेर विद्यापीठाने 30 ऑगस्ट 2025 पर्यंत निकाल जाहीर करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.