प्रभात वृत्तसेवा पुणे – राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने जाहीर केलेल्या प्रशासकीय मूल्यांकनात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मोठी नाचक्की झाली आहे. ‘सेवाशर्ती कार्यक्रमां’तर्गत राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांच्या कामकाजाचे मूल्यांकन करण्यात आले, ज्यात ‘पूर्वेचे ऑक्सफर्ड’ अशी ओळख असलेल्या पुणे विद्यापीठाला १०० पैकी अवघे ४२ गुण मिळाल्याने यादीत शेवटचे स्थान मिळाले आहे. याउलट गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाने ६८ गुणांसह राज्यात प्रथम क्रमांक पटकावत सर्वांना चकित केले आहे. तर मुंबई विद्यापीठ आणि कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ यांनी प्रत्येकी ६६ गुणांसह संयुक्तपणे द्वितीय स्थान मिळवले आहे. या निकालामुळे पुणे विद्यापीठाच्या प्रशासकीय कारभाराचे वाभाडे निघत त्यातील वास्तव चव्हाट्यावर आले आहे.अर्न्स्ट अँड यंग या कंपनीच्या मदतीने २०२४-२५ या शैक्षणिक सत्रातील कामकाजाचे हे मूल्यमापन करण्यात आले. यासाठी विद्यापीठांकडून कोणतेही नवीन अर्ज किंवा माहिती मागविण्यात आली नव्हती, तर विद्यापीठांनी शासनाकडे यापूर्वी सादर केलेल्या माहितीच्या आधारेच ही तपासणी पूर्ण करण्यात आली. विद्यापीठांचे मूल्यांकन करण्यासाठी विभागाने प्रशासकीय कामकाजावर आधारित विविध निकष निश्चित केले होते. यामध्ये प्रामुख्याने विद्यापीठाचा आकृतीबंध, सेवाप्रवेशन नियम, सर्व संवर्गांची अद्ययावत ज्येष्ठतासूची, पदोन्नतीने नियुक्तीची स्थिती आणि सरळसेवा नियुक्तीची रिक्त पदे भरण्याची स्थिती यांचा समावेश होता. यासोबतच,बिंदुनामावली प्रमाणीकरण, अनुकंपा नियुक्तींची स्थिती तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक अद्ययावत आणि डिजिटल करणे या बाबींचाही १०० गुणांच्या या मूल्यमापनात समावेश करण्यात आला होता. विद्यापीठांचे गुणांकन.. या सर्व निकषांच्या आधारे गोंडवाना विद्यापीठाने सर्वाधिक ६८ गुण मिळवत प्रशासकीय कामकाजात आघाडी घेतली. मुंबई आणि शिवाजी विद्यापीठाने प्रत्येकी ६६ गुणांसह दुसरे स्थान राखले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने ६२, तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने ६० गुण मिळवत पहिल्या पाचात स्थान मिळवले. मात्र, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (५२ गुण), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (५० गुण) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (४२ गुण) यांसारख्या मोठ्या आणि जुन्या विद्यापीठांची कामगिरी तुलनेने निराशाजनक ठरली आहे.