Pune : जीबीएसमुळे आणखी दोघांचा मृत्यू; मृतांची संख्या अकरावर

पुणे / बारामती: राज्यात गुलेन बॅरे सिंड्रोममुळे (जीबीएस) मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत असून, गेल्या २४ तासात दोन संशयितांच्या मृत्युची नोंद झाली आहे. त्यामुळे मृतांची संख्या आता ११ वर पोहचली आहे. सोमवारी नोंद झालेल्या मृतांमध्ये बारामतीमधील एका २६ वर्षीय मुलीचा समावेश असून, तिच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. दुसरा मृत्यू पिंपरी-चिंचवडमध्ये झाला आहे. दरम्यान, आज नवीन बाधित रुग्णांची नोंद झलेली नाही.
मागील दोन दिवसात जीबीएसमुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. मंगळवारी (दि. १८) एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर बुधवारी (दि. १९) पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड कार्यक्षेत्रात प्रत्येकी एक अशा दोन जणांच्या मृत्युची नोंद झाली आहे. एकूण रुग्णांपैकी चार रुग्णांचा जीबीएसमुळे मृत्यू झाल्याचे निश्चित झाले आहे, तर इतर ७ जणांचे मृत्यू संशियीत म्हणून नोंद करण्यात आली आहे.
आज नोंद झालेल्या मृतांमध्ये २६ वर्षीय मुलगी मूळची बारामती तालुक्यातील असून, पुण्यात सिंहगड रोड परिसरातील एका महाविद्यात ती शिक्षण घेत होती. जानेवारी महिन्यात ती गावी गेली असता तिला त्रास होऊ लागल्याने बारामतीमधील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिची लक्षणे जीबीएसची दिसून आल्यामुळे २५ जानेवारी रोजी तिला तात्काळ सिंहगड रोड परिसरातील रूग्णालयात दाखल केले. मात्र, मागील आठ दिवसांपासून प्रकृती चिंताजनक होत गेली आणि आज (बुधवारी) उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मावळली.
दरम्यान, शहरासह जिल्ह्यात आतापर्यंत २११ जीबीएस बाधित सापडले असून, त्यातील १८३ रूग्णांची जीबीएसचे निदान झाले आहे. ३६ रुग्ण आयसीयूमध्ये आणि १६ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. एकूण रुग्णांपैकी पुणे शहर आणि जिल्ह्यात ४२ रुग्ण पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील आहेत. तर सर्वाधिक रुग्णसंख्या (९४) ही समाविष्ट गावांतील आहे. ३२ रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका, ३३ रुग्ण पुणे ग्रामीण, तर १० रुग्ण इतर जिल्ह्यांतील आहेत.
जीबीएसची स्थिती
वय – एकूण रुग्णसंख्या
० ते ९ – २४
१० ते १९ – २६
२० ते २९ – ४४
३० ते ३९ – २७
४० ते ४९ – २९
५० ते ५९ – ३०
६० ते ६९- २१
७० ते ७९ – ६
८० ते ८९ – ४





