Pune : आणखी दोन दिवस अवकाळीचे

पुणे : शहरासह जिल्ह्यात आणि घाट माथ्यावर पुढील दोन दिवस मेघगर्जना, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांसाठी पुणे जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मागील दहा दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाने कमाल तापमानात लक्षणीय घट झाली आहे. ४३ अंशावर पोहचलेले कमाल तापमान आज ३५ अंशापर्यंत घसरले.
परिणामी दिवसभर ढगाळ वातावरणामुळे उकाडा आणि सायंकाळी अवकाळी पावसामुळे हवेत गारवा पसरलेला होता. शनिवारी (दि. १७) सकाळपासून शहरातील आकाश निरभ्र होते आणि चांगले ऊनही पडले. मात्र, दुपारनंतर आकाशात काळे ढग जमा होवू लागले. जिल्ह्यातील घाट परिसरात पावसाच्या एक ते दोन जोरदार सरी कोसळल्या.
शहर परिसरातील एनडीए, हवेली, मगरपट्टा, औंध, पाषाण, शिवाजीनगर यासह कात्रज, धायरी परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. जिल्ह्यातील राजगुरूनगर, दौंड, तळेगाव परिसरातही पाऊस झाला. दरम्यान, शहरासह जिल्ह्यात आणि घाट विभागात दिवसभर ढगाळ वातावरण आणि मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडेल. यावेळी वाऱ्याचा ताशी वेग ४- ते ५० इतका असेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.




