पुणे – व्यावसायासाठी हातऊसने घेतलेले पैसे परत न दिल्याने एकाचे अपहरण केले. मारहाण करून पैसे परत न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणात दोघांना सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली. त्या दोघांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
सनी सुनील छजलानी (वय 31, रा. केशवनगर, मुंढवा) आणि सलमान ऊर्फ उमरफारूख समीर जमादार (वय 24, रा. अप्पर इंदिरानगर) अशी पोलीस कोठडी झालेल्या दोघांची नावे आहेत. दोघांतर्फे ऍड. अभिजित जयस्वाल यांनी न्यायालयात बाजू मांडली. याबाबत राहुल चव्हाण (वय 31, रा. मोशी,आळंदी) याने फिर्याद दिली आहे. ही घटना 10 ते 14 जानेवारी या कालावधीत घडली. फिर्यादी आणि त्याच्या भावाने छजलानी व्यवसायासाठी पैसे घेतले होते. हे पैसे न दिल्याने 10 जानेवारी रोजी सिंहगड रोड कॉलेज कॅम्पस जवळील क्युबाना कॅफेजवळून फिर्यादीचे अपहरण करण्यात आले.
मारहाण करून पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देत 14 जानेवारी रोजी फिर्यादीला सोडून देण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी छजलानी आणि जमादार या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी सरकारी पक्षातर्फे सात दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली. यास बचाव पक्षाचे वकील अभिजित जयस्वाल यांनी विरोध केला. मात्र, न्यायालयाने तीन दिवस दिवस पोलीस कोठडी सुनावली.