पुणे: पुणे शहराला पुन्हा एकदा काळिमा फासणारी घटना घडली आहे. सातत्याने अपघातांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या नवले ब्रीजवर आज (गुरुवार, १३ नोव्हेंबर २०२५) पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन कंटेनर ट्रक आणि एका कारसह ३ ते ४ वाहनांची धडक झाली, ज्यात वाहनांनी पेट घेतला. प्राथमिक माहितीनुसार ५ जणांचा मृत्यू झाला असून नंतर हा आकडा ७ वर पोहोचल्याचे समजते. यात २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अपघातानंतर तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. नेमका अपघात कसा झाला? साताराच्या दिशेने पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर हा भीषण अपघात झाला. प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साताराच्या दिशेने येणाऱ्या एका कंटेनर ट्रकचा ब्रेक फेल झाला. ब्रेक फेल झालेल्या या ट्रकने थेट समोरील २० ते २५ वाहनांना धडक दिली. या धडकेनंतर एक कार समोर असलेल्या दुसऱ्या कंटेनर ट्रकला धडकली आणि दोन्ही ट्रकच्या मध्ये पूर्णपणे अडकली. त्यानंतर कार आणि दोन्ही ट्रकला भीषण आग लागली. बळींची संख्या वाढली – ज्या चारचाकी गाडीमध्ये एक कुटुंब प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती होती, त्या कारमधील ५ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची भीती आहे. तसेच, दोन्ही ट्रक चालकांचाही मृत्यू झाला असून मृतांचा एकूण आकडा ७ पर्यंत पोहोचल्याची माहिती आहे. जखमींची संख्या २०-२५ च्या आसपास आहे, ज्यात एका ट्रॅव्हलरमधील प्रवासी देखील सामील आहेत. पोलिस, अग्निशमन दल दाखल; वाहतूक ठप्प – अपघाताच्या भीषणतेमुळे तातडीने पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवून मदत व बचाव कार्य सुरू आहे. अपघातामुळे नवले ब्रीजसह रस्त्यावर काही काळासाठी वाहतूक थांबवण्यात आली होती, ज्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. सध्या मृतांचे मृतदेह बाहेर काढण्याचे आणि अपघाताचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. वसंत मोरे यांचा संताप, उच्चस्तरीय चौकशीची मागणी – या दुर्घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त होत आहे. माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली. “या पुलावर केवळ ‘रम्बलर’ लावून आणि कॅमेरे बसवून चालणार नाही. संपूर्ण रस्ता उताराचा असल्याने वाहतूक नियोजन, पोलिस व्यवस्था, सुरक्षा आणि वेगावर नियंत्रण हे सर्व करणे आवश्यक आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. एनएचयूआयच्या (NHAI) भोंगळ कारभारावर त्यांनी टीका केली. दरम्यान, माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. नवले ब्रीजवरील अपघातांच्या मालिकेतील हा आजवरचा सर्वात मोठा अपघात असल्याची चर्चा घटनास्थळी उपस्थित नागरिक करत आहेत.