Pune : सेंद्रिय शेतीकडे वळून आरोग्य जपावे – राहीबाई पोपेरे

पुणे : शेतांमध्ये रासायनिक खते, औषधे यांचा अतिरिक्त वापर होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन, विविध प्रकारचे आजार निर्माण होत आहेत. त्यामुळे आता सर्वच शेतक-यांनी सेंद्रिय शेती करण्याकडे वळले पाहिजे आणि आरोग्यही जपले पाहिजे, असे मत बीजमाता पद्मश्री राहिबाई पोपेरे यांनी व्यक्त केले.
दैनिक प्रभातच्या नारी सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून पोपेरे बोलत होत्या. यावेळी त्यांनी स्वत:ची जीवन कहाणीच सर्वांसमोर उलगडली. जीवनातील गरीबी, संघर्ष, कष्ट यातून मार्ग काढत सुरू असलेल्या समाजसेवेच्या कार्याबाबतचा पट त्यांनी उलगडला. महिलांना सन्मानामुळे उर्जा मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
गरीबीमुळे शिक्षण घेता आले नसले तरी वडिलांनी चांगले संस्कार केले. त्यातूनच समाजासाठी काही तरी करण्याची सतत इच्छा होती. त्या अनुषंगाने बचत गट तयार करुन देशी वाणाच्या बियांपासून रोपांच्या निर्मितीला चालना दिली. त्याचा व्यापही वाढवल्याचे पोपेरे यांनी सांगितले. हायब्रीड खाण्यामुळे स्वत:च्या कुटुंबातील व्यक्तींवरच आजारपण ओढवल्याचे आणि त्यातून मार्ग काढल्याचा कठीण प्रसंगही त्यांनी यावेळी सांगितला.
आपण पैसे देऊन विषाची खरेदी करत आहोत. त्यापासून दूर राहण्यासाठी बियांची बॅंक सुरु केल्याचे त्यांनी सांगितले. मग याच बियांपासून रांगोळ्या, दिवाळीचे आकाशकंदील, रक्षाबंंधनासाठी राख्या तयार करण्याचे काम सुरु केले. अनेक मुलींनी यापासून प्रेरणा घेतली. गावोगावी हे काम सुरु झाले असले तरी ते आणखी वाढले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
शेतकरी बांधवांनी एकमेकांना मदतही केली पाहिजे. त्यांनी दोन पैसे जास्त घ्यावेत, पण चांगल्या पिकांचे उत्पादन घेऊन तोच माल बाजार पेठेतही जायला पाहिजे. त्यामुळे शेतकरी वर्गाने सेंद्रिय शेतीला अधिक प्राधान्य दिले पाहिजे. जंगले वाचवली पाहिजेत. रानभाज्याही जगवल्या पाहिजेत. शहरी भागातही प्रत्येकाने उपलब्ध जागेनुसार परसबाग विकसित केली पाहिजे. यातून मुलांनाही भाजीपाल्याविषयीची माहिती मिळेल असे पोपेरे यांनी नमूद केले.
निसर्गाची शाळा शिकल्याचा आनंद
शाळा शिकण्याची खूप इच्छा होती. मात्र गरीब परिस्थितीमुळे ती पूर्ण होऊ शकली नाही, अशी खंतही बीजमाता पद्मश्री राहिबाई पोपेरे यांनी व्यक्त केली. लिहिता वाचता येत नसल्यामुळे कागद, मोबाइल कळत नाही. कोणताही अभ्यास नसताना, निसर्गाची शाळा मात्र शिकले आणि त्याचा आयुष्यात खूप फायदाही झाला. मिळालेले पुरस्कार हे काळ्या माती आणि बियांसाठीचे आहेत. आगामी काळात समाजसेवा करतच राहणार असून, आपले विचार घराघरांपर्यंत पोहोचवावेत, असे आवाहनही पोपेरे यांनी केले.





