पुणे – सिव्हिल कोर्ट ते रुबी हॉल स्थानक या दीड किलोमीटरवर सोमवारी मेट्रोची चाचणी घेण्यात आली. मेट्रो दुपारी 3 वाजून 50 मिनिटांनी सिव्हिल कोर्ट स्थानक येथून निघून 4 वाजून 7 मिनिटांनी रुबी हॉल स्थानक येथे पोहोचली. मेट्रो नियोजित वेळेत पोहचल्याने ही चाचणी यशस्वी झाल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.
चाचणीनंतर दीक्षित यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की सिव्हिल कोर्ट ते रुबी हॉल या मार्गिकेवर मंगळवार पेठ (आरटीओ) पुणे रेल्वे स्थानक, रुबी हॉल स्थानक ही महत्त्वाची स्थानके आहेत. या मार्गावर मेट्रो सुरू झाल्यास आरटीओ कार्यालय, पुणे रेल्वे स्थानक, रुबी हॉल, जहांगीर हॉस्पिटल, वाडिया कॉलेज जोडले जाणार आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर पुण्याच्या नागरिकांना या भागात येणे-जाणे सोयीचे होणार आहे.
मंगळवार पेठ स्थानक (आरटीओ) हे अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी आहे. आरटीओ कार्यालयात येणाऱ्या असंख्य नागरिकांना याचा फायदा होईल. तसेच रेल्वे आणि मेट्रो एकमेकांना जोडल्यामुळे प्रवाशांना थेट एकमेकांच्या सेवांचा लाभ घेणे सोईचे होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक आणि वनाज स्थानक ते गरवारे कॉलेज स्थानक ही 12 किमीची मार्गिका मागच्या वर्षी प्रवाशांसाठी सुरू केल्यानंतर आता लवकरच फुगेवाडी स्थानक-सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक आणि गरवारे कॉलेज स्थानक-सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक-रुबी हॉल स्थानक ही एकूण 12 किमीची मार्गिका लवकरच प्रवाशांसाठी सुरू करण्यात येईल.