पुणे – रशिया-युक्रेन युद्धामुळे युक्रेनमधील वैद्यकीय शिक्षण आणि तेथील भारतीय विद्यार्थी यांच्याबद्दल चर्चा वाढल्या आहेत. तेथील स्वस्त शिक्षण, कमी गुणवत्तेवरही मिळणारे प्रवेश आणि शिक्षणानंतर वैद्यकीय प्रॅक्टिसला असणारी संधी, असे अनेक विषय चर्चिले जात आहेत. तसेच तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सुटका असे अनेक कंगोरे पुढे येत आहेत. मात्र, डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका गुन्ह्यामुळे भारतात वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या अनुषंगाने फसवणूक करणाऱ्या रॅकेटचाही मुद्दा चर्चेत आला आहे. एमबीबीएसला वैद्यकीय प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांना ठकवल्या गेलेल्या तरुणीला नाईलाजास्तव 2019 मध्ये युक्रेन येथे वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागला. सध्या ती तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. युद्धजन्य परिस्थितीत अडकल्यानंतर तीन दिवसांपूर्वीच ती युक्रेनहून सुखरुप पुण्यात परतली आहे. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो असे सांगून भामट्यांनी 65 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सरुपम कुमार, रोहित भदोरिया, विश्वजीत सिंग, अभिषेक राज व अभिनव यादव (सर्व रा. पुणे) यांच्याविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात तब्बल 3 वर्षांनंतर तक्रार देण्यात आली आहे. त्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत संजय रमेश खत्री (रा. जुन्नर, पुणे) यांनी तक्रार दिली आहे. संबंधित आरोपींची शिवाजीनगर परिसरातील घोले रोड येथे स्कायटेक प्रा.लि. नावाची कंपनी आहे. सदर आरोपींनी संगनमत करुन संजय खत्री व इतर विद्यार्थ्यांचे पालकांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो तसेच प्रवेश निश्चित करण्यासाठी प्रत्येकी पाच लाख रुपये आणि बीएएमएससाठी तीन लाख रुपये आगाऊ रक्कम द्यावी लागेल, असे सांगितले. त्यानुसार तक्रारदार व त्यांचे मित्र यांनी सुरुवातीला 18 लाख रुपये स्कायटेक कंपनीचे नावे चेक व आरटीजीएसद्वारे भरले. परंतु त्यांच्या पाल्याचा प्रवेश केला गेला नाही. त्यानंतर मध्यप्रदेशातील इंदूर येथील अमलताश मेडिकल कॉलेज व इंडेक्स मेडिकल महाविद्यालय याठिकाणी प्रवेश मिळवून देतो, असे आश्वासन देऊन आरोपींनी तक्रारदार यांचा विश्वास संपादन करुन त्यांना 47 लाख 70 हजार रुपये भरण्यास लावले. अशाप्रकारे एकूण 65 लाख 70 हजार रुपयांचा आरोपींनी स्वीकार करत वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा प्रवेश करुन न देता फसवणूक केली आहे. याबाबत डेक्कन पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत आहे. जाहिरात पाहून आरोपींशी संपर्क फिर्यादी यांचा जुन्नर येथे सराफी व्यवसाय आहे. त्यांनी वैद्यकीय प्रवेशाची जाहिरात पाहून आरोपींशी संपर्क साधला होता. त्यांच्या परिचितांच्या मुलांनाही वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता. यामुळे सर्वांनी पुण्यात आरोपीच्या कार्यालयामध्ये येऊन प्रवेशासंदर्भात चर्चा केली. आरोपींकडून फसवणूक झाल्याने फिर्यादी यांनी मुलीचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून अखेर युक्रेन येथील महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. दरवर्षी होते अनेकांची फसवणूक पुण्यातील प्रसिद्ध खासगी महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी मोठी चढाओढ असते. यामुळे साहजिकच अशा प्रकरणांत फसवणूक करणाऱ्या भामट्यांचे जाळेच तयार झाले आहे. या जाळ्यात अडकून अनेक पालकांची लाखो रुपयांची फसवणूक दरवर्षी होते. शहरातील विविध पोलीस ठाण्यांत फसवणुकीचे गुन्हे दाखल होतात.