पहिल्या टप्प्यात १३ कोटींचा खर्च पुणे – मंगळवार पेठेतील महापालिकेचे मोठे रुग्णालय असलेल्या कमला नेहरू रुग्णालयाची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याची कबुली महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे. अनेक आवश्यक सुविधा येथे नसल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. या रुग्णालयाचा पूर्ण कायापालट करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पहिल्या टप्प्यात १३ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. आयुक्तांनी काही दिवसांपूर्वी रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली असता, अनेक त्रुटी त्यांच्या निदर्शनास आल्या. विद्युत, प्लंबिंग, रंगरंगोटी यांसह रुग्णोपचारासाठी लागणारी यंत्रणा जुनी आणि अपुरी असल्याचे स्पष्ट झाल्याने ही सर्व साधनसामग्री नव्याने खरेदी केली जाणार आहे. यामुळे रुग्णांना कमी खर्चात अद्ययावत आणि चांगल्या वैद्यकीय सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंगळवारी आयुक्त राम यांच्या उपस्थितीत आरोग्य विभाग, बांधकाम विभाग आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली. रुग्णालयासाठी आवश्यक सुधारणा, उपकरणांची खरेदी आणि विभागनिहाय दुरुस्ती या सर्वांचा समावेश असलेला १३ कोटी रुपयांच्या खर्चाचा आराखडा यावेळी सादर करण्यात आला. तज्ज्ञ डॉक्टरांचे वेतन वाढविणार रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत डॉक्टरांना निश्चित केलेले ४५ ते ६० हजार रुपये वेतन अपुरे असल्याने तज्ज्ञ उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे महापालिका स्वतः निधी टाकून गुणवत्तेनुसार ८० हजार ते दोन लाख रुपये वेतन देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे आयुक्त राम यांनी सांगितले.