पुणे – वडगावशेरी विधानसभा मतदार संघात निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रथम प्रशिक्षणाला येरवडा येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात सुरुवात झाली. रविवारी (दि.२७) ही हे प्रशिक्षण सुरुच राहणार आहे. प्रशिक्षण सकाळ व दुपार असे दोन सत्रात चालू असुन एकूण २०७६ प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणास उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारवकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तृप्ती कोलते पाटील यांनी मार्गदर्शन केले. सचिन बारवकर यांनी प्रशिक्षणार्थीना मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष करावयाच्या कामकाजाबाबत सविस्तर प्रशिक्षण दिले. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सोपविलेली जबाबदारी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी व्यवस्थितपणे पार पाडावी असे त्यांनी सांगितले. निवडणूक प्रकिया पार पडताना कोणतीही चूक होऊ नये यासाठी अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे तीन टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येत असून पहिले प्रशिक्षण पुर्ण झाले आहे. या प्रशिक्षणामध्ये मतदान प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी प्राधान्याने करावयाच्या अनिवार्य बाबी, मतदान यंत्रे हाताळणीबाबत असलेल्या तांत्रिक बाबी, मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रिया पार पाडत असताना सर्व यंत्रे सुरळीतपणे कार्यान्वित आहेत किंवा नाही याची खातरजमा करणे, मतदान प्रकिया सुरु होण्यापूर्वी उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर प्रत्यक्ष मतदानाआधी मॉक पोल घेणे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.