प्रभात वृत्तसेवा पुणे – गेल्या काही दिवसांपासून रेल्वे गाड्यांना उशीर होत असल्यामुळे सुट्ट्यांमध्ये बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची तारांबळ उडत आहे. स्थानकावर तासंतास गाड्यांची वाट पहावी लागत आहे. पुणे विभागातून धावणाऱ्या हजरत निझामुद्दीन, झेलम, आझाद हिंद एक्स्प्रेस, पुणे-सांत्रागाची आणि दानापूर या रेल्वेगाड्यांना सात ते आठ तास उशीर होत आहे.पुण्यातूून दिल्ली, पाटणा, कोलकाता, इंदूर, जबलपूर, कन्याकुमारी आणि इतर भागांत महत्त्वाच्या रेल्वे धावतात. काही वेळा गाड्यांना सिग्नल न मिळाल्याने गाड्या थांबवाव्या लागतात. यामुळे पुढील स्थानकांवर पोहोचण्यासाठी उशीर होतो. त्यामुळे सर्व गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होत आहे. तसेच बिलासपूर विभागात जोडणीचे काम सुरू आहे. तसेच इतर विभागातही तिसऱ्या, चाैथ्या लाइनचे काम सुरू आहे. त्यामुळे रेल्वेच्या वेगावर परिणाम होत आहे. परिणामी प्रवाशांना रेल्वेमध्ये बराच वेळ अडकून पडावे लागत आहे. मुख्य स्थानकातून गाडी वेळेवर निघूनसुद्धा मार्गावर काम सुरू असल्यामुळे रेल्वेगाड्यांना पुढे सिग्नल मिळत नाही. पुणे विभागातून धावणाऱ्या रेल्वे वेळेवर निघतात, पुढील मार्गावर सिग्नल न मिळाल्याने त्यांना उशीर होत असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. सात तास विलंब झेलम, हावडा, आझाद हिंद आणि दानापूर या गाड्या पुणे विभागातून धावतात. बिलासपूर व इतर विभागांत कनेक्टिव्हिटीचे काम सुरू आहे. तसेच खांडवा विभागात नव्या मार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे या विभागातून धावणाऱ्या गाड्यांना सतत उशीर होत आहे. या सर्व गाड्यांना पुण्यात पोहोचायला पाच ते सात तासांपर्यंत उशीरहोत आहे. परिणामी प्रवाशांचे पुढील नियोजन विस्कळीत होत असून, मनस्तापही सहन करावा लागत आहे. दरम्यान, आम्ही सुपरफास्ट गाडीने आलो. मात्र, आज या गाडीला उशीर झाला. सकाळी लवकर काम उरकून माघारी फिरण्याचे नियोजन फिसकटले. आता मुक्कामाशिवाय पर्याय नाही, अशी माहिती एका प्रवाशाने दिली.