प्रभात वृत्तसेवा पुणे : शहरात परवाने खुले केल्याने रिक्षांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. या रिक्षा रस्त्यावर, चौकात जागा मिळेल तिथे थांबतात. वर्दळीच्या रस्त्यांवर कोंडी करतात. त्यामुळे वाहतूक कोंडीला रिक्षा जबाबदार आहेत. त्यामुळे रिक्षांच्या परवान्यांवर मर्यादा आणण्यासाठी राज्यशासनाकडे विनंती करण्याचा निर्णय महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. शहरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या आढावा बैठकीत पोलीस आणि महापालिकेने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. त्यानंतर या कोंडीची जबाबदारी वाढत्या रिक्षांवर फोडण्यात आली.गेल्या काही वर्षांत शहरातील रिक्षांची संख्या दीड लाखांच्या जवळ गेली आहे. त्यामुळे त्यांच्यावर मर्यादा आणली नाहीतर कोंडी फुटणार नाही असा निष्कर्ष बैठकीत काढण्यात आला.बैठकीत पोलीस शहरात चौकांमध्ये कारवाई करत नसल्याची तक्रार पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली. पोलीस चौका चौकात रस्ते अडवतात, मात्र रिक्षांवर कारवाई करत नाहीत. रिक्षा थांबे असतानाही ते तेथे थांबत नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी पोलीस प्रशासनानेही रिक्षांचा मुद्दा मांडला. पूर्वी रिक्षा परवान्यांना मर्यादा होती. त्यामुळे, रिक्षांची चौकात वर्दळही कमी होती. त्यांच्यावर कारवाईस मर्यादा येते. त्यामुळे कोंडी होते. तसेच, रिक्षाच्या थांब्यांची फेररचना आवश्यक असून त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने थांबे निश्चित करावे असे सुचविण्यात आले. तसेच, रिक्षाचे परवाने वाढतच राहिल्यास कोंडी वाढतच जाणार असल्याची भिती व्यक्त करण्य़ात आली. त्यानंतर रिक्षा परवान्यांबाबत फेरविचार करावा तसेच त्यावर मर्यादा आणावी यासाठी शासनाला पत्र पाठविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच ही जबाबदारी महापालिकेवर देण्यात आली. संयुक्त समिती नेमणार.. बैठकीत रिक्षांच्या अधिकृत थांब्याबाबतही चर्चा झाली. त्यात, प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी थांब्यांबाबत महापालिकेसही सहभागी करून घ्यावे अशी चर्चा झाली. त्यानुसार, महापालिकेचा पथ विभाग, प्रकल्प विभाग, वाहतूक पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली जाणार आहे. त्यात, किती थांबे असावेत, रस्त्यांवर अडथळा ठरणारे कोणते थांबे स्थलांतरीत करावे, याबाबत चर्चा करून सुधारीत प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. “शहरातील रिक्षांची संख्या दीड लाखांच्या आसपास आहे. पोलिसांकडून ही बाब निर्दशनास आणून देण्यात आली. तसेच त्यावर नियंत्रण असणे आवश्यक असल्याची चर्चाही झाली. त्यानुसार शासनाकडे याबाबत पत्र पाठविण्यात येणार असून खुल्या परवाना धोरणाचा विचार करण्याची मागणी त्यात केली जाणार आहे.” – नवल किशोर राम ( महापालिका आयुक्त)