Pune Traffic : वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिका वर्दळीच्या ३२ प्रमुख रस्त्यांवरील अडथळे दूर करणार आहेत. त्यासाठी रस्त्यांवरील पायाभूत सुविधा आणि कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या अडचणी दूर केल्या जाणार आहेत. या रस्त्यांसाठी पालिकेचे ३२ आणि पोलिस विभागाचे ३२ असे एकूण ६४ अधिकारी समन्वयक म्हणून नियुक्त केले आहेत. या अधिकाऱ्यांनी संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून कामांच्या प्रगतीवर देखरेख ठेवायची आहे. सोमवारी झालेल्या शहर परिवर्तन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शहरातील वाढती आव्हाने लक्षात घेऊन विविध शासकीय व निमशासकीय यंत्रणांमध्ये समन्वय वाढविण्यासाठी शहर परिवर्तन समिती स्थापन केली आहे. या समितीची दुसरी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीस महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर, प्रजित नायर, ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्यासह महाराष्ट्र राज्य वीजवितरण कंपनी, भूमी अभिलेख, दूरसंचार सेवा प्रदाते, महामेट्रो, पीएमपीएमएल, पीएमआरडीए, वन विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच पालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. भूसंपादनावर भर शहरातील १२ मिसिंग लिंक रस्त्यांच्या विकासासाठी भूसंपादन, मोजणी आणि अतिक्रमण हटविण्यातील अडचणींवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. बाणेर–पाषाण लिंक रोड, वाकड–कस्पटे वस्ती रस्ता, आंबेडकर चौक ते राजाराम पूल रस्ता आणि वारजे येथील रोजरी स्कूल ते तिरुपती नगर या मार्गांवरील कामांना गती देण्यासाठी संबंधित विभागांना वेळेत कार्यवाहीचे आदेश दिले. भूसंपादनातील अडथळे तातडीने दूर करून प्रस्ताव जिल्हाधिकारी मंजुरीसाठी सादर करण्याच्या सूचनाही दिल्या. पावसाळ्यापूर्वी वॉटर लॉगिंगवर उपाययोजना • वाहतूक पोलिसांचे पीटीपी ॲप पालिकेच्या ॲपशी जोडणार • रस्ता खोदाईसाठी पोलीस तातडीने एनओसी देणार • वन विभागाच्या जागांवरील प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करणार • प्रमुख रस्त्यांवर रिक्षा थांबे निश्चित होणार, बेवारस वाहने हटविणार • पाच महत्त्वाच्या रस्त्यांवर पे अँड पार्क योजना राबविणार