Pune Traffic Changes: तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शुक्रवारी (६ मार्च) पुण्यातील मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर मिरवणुका निघणार आहेत. लक्ष्मी रोड, शिवाजी रोड परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन शहर वाहतूक शाखेने सकाळी ७ वाजल्यापासून मिरवणुका संपेपर्यंत नेहरू रोड, लक्ष्मी रोड, शिवाजी रोड आणि बाजीराव रोड या मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते बदल केले आहेत. पोलीस उपआयुक्त (वाहतूक) हिंमत जाधव यांनी ही माहिती दिली. मध्यवर्ती भागातील पर्यायी मार्ग – जिजामाता चौकातून शिवाजी रोडने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांना स. गो. बर्वे चौक – जंगली महाराज रोड – खंडोजीबाबा चौक – टिळक चौक – टिळक रोड मार्गे वळवण्यात येईल. दारुवाला पुलाकडून फडके हौद चौक व जिजामाता चौकाकडे येणारी वाहतूक दारुवाला पुल चौकातूनच पर्यायी मार्गाने सोडण्यात येईल. अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणारी वाहतूक केळकर रोडमार्गे वळवली जाईल. मिरवणूक लक्ष्मी रोडवर असताना सोन्या मारुती चौकापर्यंत लक्ष्मी रोडवरील वाहने संत कबीर चौकाकडून वळवण्यात येतील. पुरम चौकातून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांना टिळक रोड – अलका टॉकीज चौक – एफसी रोड मार्गे जावे लागेल. मिरवणुका सुरू झाल्यानंतर अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौक व बाजीराव रोडकडे जाणारी वाहतूक बंद करून केळकर रोडकडे वळवण्यात येईल. गाडगीळ पुतळा परिसरात मिरवणूक असताना वाहने सावरकर भवन पुल – बालगंधर्व चौक किंवा टकले हवेली मार्गे जातील. शनिवार वाड्याकडे जाणारी वाहतूक कॉसमॉस बँक जंक्शन – टिळक पुल – मनपा किंवा टकले हवेली मार्गे सोडण्यात येईल. कॅम्प परिसरातही बदल – लष्कर वाहतूक विभागाच्या हद्दीतही बदल करण्यात आले आहेत. गोळीबार मैदान चौकातून एमजी रोडकडे येणारी वाहतूक वाय जंक्शनवर बंद करून खाणे मारुती चौकाकडे वळवण्यात येईल. मुफ्ती फौज चौकातून कुरेशी मशिदीकडे जाणारी वाहतूक चुडामन तालीम मार्गे वळवली जाईल. व्होल्गा चौकातून मोहम्मद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक ईस्ट स्ट्रीट रोडमार्गे इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येईल. महावीर चौक, सरबतवाला चौक, बाबाजान चौक आणि शिवाजी मार्केट परिसरातही गरजेनुसार वाहतुकीचे वळण बदलण्यात येणार आहे. पोलिसांचे आवाहन – वाहतूक शाखेने नागरिकांना शक्यतो मध्यवर्ती भागात खासगी वाहनांचा वापर टाळावा, पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.