Pune : पर्यटकांना गतवैभवाची साक्ष अनुभवता येईल

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यात पेशवे घराण्याचे योगदान मोठे आहे. शनिवारवाडा हा पेशव्यांच्या पराक्रमाचा अमूल्य साक्षीदार आहे. त्यामुळे पुण्यात येणाऱ्या पर्यटकांना येथील पूर्ववैभवाचा, दिव्यतेचा अनुभव घेता यावा, यासाठी पुरातत्व कायद्यातील तरतुदींच्या आधारे सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी गुरुवारी दिले.
खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या पाठपुराव्याने शेखावत यांनी गुरुवारी शनिवारवाड्याला भेट देऊन पाहणी केली. या वेळी शनिवारवाड्यासह अन्य ऐतिहासिक वास्तूंची माहिती देणाऱ्या बहुभाषिक ऑडिओ गाइडचे लोकार्पणही शेखावत यांच्या हस्ते झाले. पुरातत्व विभागाच्या संचालक श्री लक्ष्मी, पेशव्यांचे वंशज पुष्कर पेशवा, पुरातत्व वास्तुरचनातज्ज्ञ किरण कलमदानी, इतिहास अभ्यासक लेखक, कमांडर डॉ. उदय कुलकर्णी (नि.), पल्लवी गोखले, इतिहास अभ्यासक उपस्थित होते.
शनिवारवाडा ही केंद्र सरकारच्या अखत्यारितील संरक्षित वास्तू आहे. त्यामुळे शनिवारवाड्यासह परिसराला केंद्रीय पुरातत्व कायद्याचे नियम लागू आहेत. शनिवारवाड्याच्या बांधकामात फेरबदल करणे शक्य नाही. मात्र, कायद्याच्या अधीन राहून शक्य तेवढ्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे शेखावत म्हणाले.
शनिवारवाडा येथे अस्तित्वात असलेल्या ऐतिहासिक चित्रांचे पुनरुज्जीवन होण्यासाठी पाठपुरावा करत आहे. त्यानुसार केलेल्या विनंतीनुसार शेखावत यांनी शनिवारवाड्याला भेट देऊन पाहणी केल्याचे खा. डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.
बांधकामांना कायद्यानुसारच परवानगी
शनिवारवाड्याच्या शंभर मीटर परिसरात पुरातत्त्व कायद्यानुसार बांधकामांवर बंदी आहे. याबाबत विचारले असता, शेखावत म्हणाले, देशभरात कोठेही संरक्षित वास्तूच्या १०० मीटर परिसरात बांधकाम करता येत नाही, तर २०० मीटर अंतरात दुरुस्तीचे काम करायचे असल्यास पूर्वमान्यता आवश्यक आहे. कायदेशीर तरतुदीनुसारच याबाबत निर्णय घेतला जाईल.





