आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रभारी जरवाल यांचा दावा पुणे : महाराष्ट्रातील प्रस्थापित राजकीय पक्षांनी आपली विचारधारा सोडून सामान्य माणसाचा अपेक्षाभंग केला आहे. आज कोणता नेता कुणासोबत आहे, हे समजणे कठीण झाले आहे. राज्यात भ्रष्टाचाराने परिसीमा गाठली असून निवडून आल्यानंतर अनेक नगरसेवक कोट्यधीश झाले आहेत, अशी टीका आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रभारी व दिल्लीचे माजी आमदार प्रकाश जरवाल यांनी पत्रकार परिषदेत केली. विकासाची गंगा सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी शाळा, दवाखाने, वाहतूक आणि रोजगार यांचे सक्षमीकरण करणे हे आम आदमी पार्टीचे धोरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंजाब आणि दिल्लीमध्ये जे बदल करून दाखवले, तेच आपचे विकासाचे मॉडेल महाराष्ट्रात राबवले जाईल, असेही त्यांनी सांगितले. आम आदमी पार्टी ही निवडणूक स्वबळावर लढणार असून सर्व जागा लढवण्याचा प्रयत्न असेल. प्रामाणिक व इमानदार कार्यकर्ते आमच्याकडे असल्याने अनेक नगरपालिकांमध्ये उमेदवारांची यादी जाहीर करून पक्षाने आघाडी घेतली आहे, असे जरवाल म्हणाले. आम आदमी पार्टीने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल, खासदार संजय सिंग, माजी मुख्यमंत्री अतिशी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि राखी बिडलान हे महाराष्ट्रात प्रचारासाठी येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.या वेळी आप राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, शहर अध्यक्ष धनंजय बेनकर, सुदर्शन जगदाळे तसेच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. पक्षाची दुसरी यादी जाहीर आम आदमी पार्टीने पुणे महानगरपालिकेसाठी १६ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. महानगरपालिकेची निवडणूक आम आदमी पार्टी पूर्ण ताकदीने लढणार असून, इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत उमेदवार जाहीर करण्यात पक्षाने आघाडी घेतल्याचे यावेळी सांगण्यात आले. समाजातील सर्व घटकांना उचित न्याय देण्याच्या भूमिकेतून आतापर्यंत आम आदमी पार्टीकडून एकूण ४१ उमेदवार जाहीर केले आहेत. येत्या दोन दिवसांत आणखी उमेदवारांची घोषणा केली जाणार असल्याची माहिती पक्षाचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी दिली.