एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून बछड्यांना पाहता येणार
पुणे – कात्रज प्राणी संग्रहालयातील वाघांच्या बछड्यांच्या दर्शनाची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. ही बछडी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून पर्यंटकांना पाहण्यासाठी खुली करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. त्यासाठी आवश्यक शारीरिक आणि खंदकाची तपासणी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
कात्रज प्राणीसंग्रहालयातील “बगिराम’ आणि “रिद्धी’ या वाघाच्या जोडप्यास ऑक्टोबरमध्ये 4 गोंडस पिल्ले झाली. त्यात 3 नर, तर 1 मादी जातीचे आहे. महापौर मुक्ता टिळक याच्या उपस्थितीत या गोंडस बछड्यांचे “पौर्णिमा’, “सार्थक’, “आकाश’, “गुरू’ अशी नावे ठेवण्यात आली आहे. या नामकरण सोहळ्यानंतर प्राणी संग्रहालयात शनिवारी आणि रविवारी येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय वाढली आहे. मात्र, प्रत्यक्षात ही बछडी अद्याप नागरिकांना पाहण्यासाठी खंदकात न सोडता पिंजऱ्यातच आहेत. त्यामुळे पर्यटकांना व्याघ्रदर्शन होत नव्हते. तर प्राणीसंग्रहालयात वाघांसाठी महापालिका प्रशासनाने बनविलेले खंदक “मोल्ड’ पद्धतीचे असून ते सुमारे चार ते पाच फूट खोल आहे. या खंदकात पाणी आहे. त्यामुळे पिंजऱ्याबाहेर हे बछडे सोडल्यास या खंदकात पडून त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन या बछड्यांची उंची, त्यांची शारीरिक क्षमता या बाबी लक्षात घेऊन त्यांना पिंजऱ्यातून बाहेर सोडले जाणार होते. दरम्यान, या चारही बछड्यांची प्रगती उत्तम असून त्यांची वाढही चांगली असल्याचे सांगण्यात आले.
उन्हाळ्याच्या सुट्टीत होणार दर्शन
सध्या सर्व शाळांच्या परीक्षा सुरू असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून अनेक शाळांना सुट्ट्या लागणार आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात प्राणी संग्रहालयात येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढते. या वर्षी ही बछडी गेल्या काही महिन्यांत बाल चमूंसाठी चर्चेचा विषय ठरली असून बारशाच्या उपक्रमानंतर ती खंदकात बाहेर सोडण्यात आलेली आहेत किंवा नाही याची माहिती नसली, तरी पर्यटक या वाघांबाबत विचारणा करत आहेत. मात्र, अखेर ही प्रतीक्षा संपणार आहे.