पुणे : पीएमपीकडून तिकिट दरवाढ स्टेजनुसार केली आहे. त्यामुळे पहिल्या स्टेजमध्ये (सुरवातीच्या पाच किलो मिटरसाठी) १० रुपये तिकिट असेल तर दुसरा स्टेज सुरू होताच प्रवाशाला थेट २० हजार रुपये तिकिट दर द्यावे लागणार आहे. त्यामुळे हा दर कमी करण्यात यावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) जाहीर केलेली तिकीट दरवाढ येत्या दि. १ जूनपासून लागू करण्यात येणार आहे. पीएमपीने दि. २० डिसेंबर २०१४ला शेवटची प्रवासी तिकीट दरवाढ केली होती. त्यामध्ये १ ते ७८ कि.मी.साठी दोन कि.मी.च्या अंतराने १ ते ४० पर्यंत स्टेज रचना निश्चित करून दर आकारणी केली होती. आता, त्यात बदल करून ११ स्टेज केले आहेत. त्यामध्ये १ ते ३० कि.मी. अंतरासाठी ५ कि. मी. च्या अंतराने ६ स्टेज आणि त्यापुढे ३० ते ८० कि.मी. अंतरासाठी १० कि.मी.च्या अंतराने ५ स्टेज असे एकूण ११ स्टेज रचनेत कि.मी. आधारित सहरचना करण्यात आली आहे. पहिल्या स्टेजमध्ये पाच कि.मी. अंतर आहे. त्यासाठी प्रवाशांना १० रुपये तिकीट द्यावे लागेल. मात्र, एखादा प्रवाशाला दुसऱ्या स्टेजमधील पहिल्याच थांब्यावर उतरायचे असले तर त्याला थेट २० रुपये तिकीट द्यावे लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला मोठी झळ बसणार असून, तिकिट दरवाढीत पुढील स्टेज रचना करताना पाच रुपये तिकीट वाढविण्याची रचना करावी. एकदम दुप्पट दर आकारू नये, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.