पुणे – पुणे-लोणावळा-पुणे मार्गावरील लोकलच्या संख्येत तीन फेऱ्या वाढवण्यात येणार आहे. 11 एप्रिलपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मात्र, पूर्वीप्रमाणे सर्व फेऱ्या सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
निर्बंध शिथिल झाल्यानंतर रेल्वेकडून एक्स्प्रेस, डेमू, मेमूची सेवा पूर्ववत करण्यात येत आहे. मात्र पुणे-लोणावळा या मार्गावरील लोकलच्या संख्या मात्र तुलनेने कमी आहेत. लॉकडाऊनपूर्वी होणाऱ्या 42 फेऱ्यांपैकी सध्या केवळ 20 फेऱ्या धावत आहेत. त्यामुळे ही संख्या वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे. अखेरीस यामध्ये तीन फेऱ्यांची भर पडणार आहे. तर सध्या निर्बंधांच्या धास्तीने अनेक लोकलमध्ये निम्म्याहून कमी प्रवासी असल्याचे चित्र आहे.
पुण्याहून सकाळी 11.17, सायंकाळी 5.15 वाजता आणि शिवाजीनगरहून रात्री 8.35 वाजता लोकल सुटणार असून, लोणावळ्याहून दुपारी 3.30, सायंकाळी 7 आणि रात्री 10.05 वाजता लोकल सुटणार आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.