Pune : ‘कन्फर्म’ तिकिटासाठी तीन महिने; तीन मिनिटांत ट्रेन रद्द

पुणे, दि. 19 -दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्यांना रेल्वे प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा पुन्हा एकदा फटाका बसला आहे. सोलापूर विभागातील दौंड-मनमाड रेल्वे मार्गावरील काष्टी आणि बेलवंडी रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचे काम सुरू असल्याने या मार्गावरील काही रेल्वे रद्द अचानक रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे खिशाला कात्री लावत प्रवाशांना पर्यायी साधने शोधावी लागणार आहेत. विशेष म्हणजे अनेक प्रवाशांनी तीन महिने आधी तिकिटे बुक केली होती, तर काहींचे तिकीट वेटिंगनंतर तिकीट कन्फर्म झाले होते.
पैसे मिळतील, प्रवासाचे काय?
विदर्भ, मराठवाड्याकडे प्रवाशांची रेल्वेला पसंती असते. त्यामुळे अनेक जण दोन-तीन महिने आधीच तिकीट बुक करतात. मात्र, अवघ्या काही मिनिटांतच ट्रेन रद्द झाल्याचे मेसेज पाठवून प्रवाशांची तारांबळ उडवली जात आहे. यात 100 टक्के रक्कम त्यांच्या बॅंक खात्यात जमा केली जाते. तसेच काउंटर तिकीट असेल, तर तेथे जाऊन पैसे घ्यावे लागतात. हे पैसे जरी पूर्ण मिळणार असले तरी पुढील प्रवास करायचा कसा? हा प्रश्न प्रवाशांसमोर उभा राहत आहे.
रेल्वेने दगा दिला, प्रवासी संतप्त
आधीच ट्रॅव्हल्स कंपन्यांनी अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी सुरू केली आहे. एसटीनेही हंगामी दरवाढ केली आहे. आता रेल्वेनेच आयत्यावेळी दगा दिल्याने प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल कंपन्यांचा आधार घ्यावा लागणार असून वाढीव खर्चाचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. तिकीट मिळेल का नाही याची शास्वती नसल्याने ऐण सणासुदीत प्रवाशांना मनस्ताप सहन करत घर गाठावे लागणार आहे. त्यामुळे रेल्वेने ट्रेन रद्द करत गैरसोय का केली, असा संतप्त सवाल प्रवासी करत आहेत.
मी नागपूरला जाण्यासाठी तिकीट काढले होते. मात्र, अचानक ट्रेन रद्द झाल्याने मला खासगी बसने जावे लागणार आहे. त्याचे तिकीट चार ते पाच हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे वाढीव खर्चाचा बोजा पडणार आहेच; पण ट्रेन मिळेल का नाही याची शाश्वतीही नाही.
– स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारा उमेदवार
प्रवाशांनो, कृपया लक्ष द्या…
दि. 20 ऑक्टोबर रोजीच्या रद्द ट्रेन ः पुणे-नागपूर (22141), साईनगर शिर्डी – दादर (11042), गोंदिया – कोल्हापूर (11040), पुणे-निजामाबाद (11410)आणि पुणे-भुसावळ-पुणे (01135/36)
दि. 21 ऑक्टोबर रोजीच्या रद्द ट्रेन ः पुणे-अजनी एसी एक्स्प्रेस (22123), पुणे-नागपूर एक्स्प्रेस (22142)




