पुणे – पुणे ते लोणावळा मार्गावर धावणाऱ्या लोकल गाड्या वेळेत धावत नसल्याच्या तक्रारी वारंवार प्रवाशांकडून करण्यात येतात. परंतु, या मार्गावरील सुमारे 95 टक्के गाड्या वेळापत्रकानुसार धावत असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे. यापुढेही हे प्रमाण कायम राखणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
पुणे ते लोणावळा या मार्गावर नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी आदी प्रवाशांची संख्या सुमारे एक लाखांपेक्षा जास्त आहे. मुंबई शहरातील उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या, पुणे-लोणावळा या महत्त्वाच्या स्थानकांदरम्यान लोकलच्या एकूण 44 फेऱ्या होतात.
रेल्वे प्रवाशांकडून गाडीच्या वेळेतील अनियमितता आणि ब्लॉकबाबत अनेकदा तक्रारी केल्या जातात. मात्र, यावर्षी रेल्वे गाड्यांच्या वेळेत सुधारणा करण्यात प्रशासनाला यश आले असल्याचा दावा करण्यात आला आहे. गेल्यावर्षी हे प्रमाण 86.73 टक्के होते, यामध्ये 8-9 टक्क्यांनी सुधारणा झाली आहे. तर मार्च 2018 ते मार्च 2019 या कालावधीत मार्गावरील 95 टक्के लोकल वेळेत धावल्याचा दावा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला आहे.