पुणे – …तर पीएमपीवर दंडात्मक कारवाई करू

वाहतूक पोलिसांचा पीएमपीएमएल प्रशासनाला इशारा

पुणे – वारंवार ब्रेकडाऊन होणाऱ्या पीएमपी बसेसचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या बसेसमुळे वाहतूक कोंडीमध्ये भर पडते. या पार्श्‍वभूमीवर वाहतूक पोलिसांनी पीएमपीएमएल प्रशासनाला दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या दंडात्मक कारवाईबाबत पीएमपीचे अधिकारी, बसेसचे ठेकेदार आणि वाहतूक विभागामध्ये झालेल्या बैठकीत सूचना करण्यात आल्या आहेत.

शहराची प्रमुख सार्वजनिक वाहतूक असणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेस भर रस्त्यामध्ये बंद पडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. बसेस अचानक बंद पडल्याने दुसऱ्या बसची वाट पाहावी लागत असल्याने प्रवासी वारंवार नाराजी व्यक्त करतात. प्रवाशांच्या गैरसोयीबरोबरच अरुंद रस्त्यांवर बसेस बंद पडल्याने वाहतूक कोंडी होते. या पार्श्‍वभूमीवर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये ब्रेकडाऊन झालेल्या बसेस तत्काळ बाजूला हटवणे, नादुरूस्त बसेस रस्त्यावर न उतरवणे आदी सूचना दिल्या पीएमपी प्रशासनाला दिल्या आहेत. भररस्त्यात बस बंद पडून वाहतुकीला अडथळा झाल्यास दंडात्मक कारवाई करणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. दरम्यान, वाहतूक पोलिसांकडून देण्यात आलेल्या सूचना गांभीर्याने घेण्यात आल्या आहेत. ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी करण्यासाठी संबंधित विभागाला सांगण्यात आले आहे. विशेषतः वर्कशॉप कर्मचारी आणि वायरलेस विभागाला याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

यापूर्वी पीएमपीला पाच हजारांचा दंड
वाहतूक नियमांचे पालन न करता बस चालविणाऱ्या चालकावर वाहतूक पोलिसांनी यापूर्वी कारवाई केली होती. संबंधित चालकाला पाच हजार रुपयांचा दंड लावण्यात आला होता. या कारवाईप्रमाणे यापुढेही नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले.

“त्या’ बसेसची होणार तपाणसी
वाहतूक पोलिसांनी घेतलेल्या दंडात्मक कारवाईच्या पवित्र्यानंतर पीएमपी प्रशासनाने पावले उचलली आहेत. पीएमपीने यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली असून या पथकाकडून दंड ठोठावण्यात आलेल्या बसेसची तपासणी करण्यात येणार आहे.

वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अनेक बसेसवर होणाऱ्या कारवाईमुळे पीएमपी प्रशासनाला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. बस बंद पडण्याचे कारण काय ? कोणाच्या चुकीमुळे बस बंद पडली ? एकंदरीतच “अशा’ बसेसची जबाबदारी कोणाची याची शहानिशा करण्यात येणार आहे. तपासणी करून अहवाल प्रशासनाकडे सादर करण्यात येणार आहे.

समिती स्थापन
नव्याने नियुक्त करण्यात समितीमध्ये प्रशासनातील चार सदस्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये अपघात विभागप्रमुख संजय कुसाळकर, बबन काकडे (चेकर), राजेंद्र सपकाळ (हेल्पर), विनोद जाधव यांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.