पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बहुचर्चित मराठी भाषा भवनाचे काम संथगतीने सुरू आहे. या भवनमधील अन्य इमारतीचे बांधकाम अपूर्ण असल्याने प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दर्जाचे मराठी भाषा केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असताना विद्यापीठातील भवनाचे कामही तातडीने पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

विद्यापीठामध्ये काही वर्षांपूर्वी मराठी भाषा भवन प्रस्तावित करण्यात आले. मात्र, बराच काळ हे काम प्रलंबित राहिले. मराठी भाषा भवनासाठी पाठपुरावा केल्यानंतर गेल्या वर्षी महाराष्ट्र दिनी या भवनाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, त्यानंतर पुढील काम अद्याप पूर्ण झाले नसून ते अतिशय संथगतीने सुरू आहे. याबाबत मराठी विभागातील विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

विद्यापीठाने मराठी भाषा भवनाच्या अनुषंगाने समिती नियुक्त केली. त्यामध्ये ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, डॉ. राजेश्वरी देशपांडे यांचा समावेश आहे. या समितीने अंतरिम अहवालही सादर केलेला आहे. त्यानुसार मराठी भाषा भवनांतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मराठी केंद्र स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. समितीने अंतरिम अहवालात १५ ते १६ उपविभाग सुचवले आहेत.

त्यामध्ये पाठ्यपुस्तकनिर्मिती, कोशनिर्मिती, अनुवाद, शालेय ते उच्च शिक्षणातील शिक्षकांना प्रशिक्षण, प्रशिक्षणासाठीची पाठ्यपुस्तके, बोली भाषांचा अभ्यास, मराठी भाषा संग्रहालय, प्रयोगशाळा अशा घटकांचा समावेश आहे. मराठीमध्ये ज्ञाननिर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार मराठी भाषा भवनात मराठी भाषा केंद्र स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली आहे.

कामकाज सुरू…
मराठी भाषा भवनाच्या अन्य इमारतीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत थांबून राहण्यापेक्षा ज्या इमारतीचे काम पूर्ण होत आले आहे, अशा ठिकाणी प्रत्यक्ष कामकाजास सुरूवात करण्यात आली आहे. मराठी भाषा भवनातील मराठी भाषा केंद्र हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याचा प्रयत्न असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले.