पुणे -पुणे महानगर प्रादेशिक महामंडळाने तिकीट चेकरसाठी दहा खासगी वाहने भाडेतत्वावर घेतली होती. या वाहनांवर महिन्याला 8 ते 9 लाख रुपये खर्च होत होता. पीएमपीची संचलन तूट वाढत असताना प्रशासन अवास्तव खर्च करत असल्यामुळे पीएमपीवर चौफेर टीका केली जात होती. याची दखल पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी घेतली असून, दहापैकी पाच गाड्या कमी करण्याचे आदेश दिले आहेत. पीएमपीची दिवसेंदिवस संचलन तूट वाढत असल्याने बकोरिया यांनी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. पीएमपी प्रशासनाने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यासाठी तपास पथके नेमली आहेत. या पथकांना फिरण्यासाठी 10 खासगी वाहने दिली होती. या वाहनांवर ऑगस्ट 2021 ते 2022 सप्टेंबर या कालावधीत 72 लाख 57 हजार 235 एवढा खर्च झाला होता. तिकीट चेकर यांना व्हीआयपी ट्रिटमेन्ट कशासाठी, हा प्रश्न विविध स्वयंसेवी सस्थांनी उपस्थित केला होता. तसेच तिकीट चेकर यांनी या खासगी वाहनांऐवजी पीएमपी बसने फिरून तिकीट चेक करावे आणि पीएमपीचा अवास्तव खर्च कमी करावा, अशी मागणी काही स्वयंसेवी सस्थांनी केली होती. याबाबतचे वृत्त सर्वप्रथम दैनिक “प्रभात’ने “तिकीट चेकरवर होऊ द्या खर्च’ या आशयाने पाच डिसेंबर रोजी दिले होते. बकोरिया यांनी याची दखल घेतली. पीएमपीची संचलन तूट कमी करण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. बीआरटी मार्गावरील सुरक्षारक्षक कमी केले आहेत. आता चेकरसाठी असलेली वाहने कमी केली आहेत. त्यामुळे पीएमपीची संचलन तूट कमी होईल. – ओमप्रकाश बकोरिया, पीएमपी अध्यक्ष