पुणे : महापालिकेकडून आजी- माजी नगरसेवकांना वैद्यकीय उपचाराचा व औषधाचा १०० टक्के खर्च दिला जातो. २०२४-२५ या वर्षाच्या अंदाजपत्रकात नगरसेवकांच्या उपचारासाठी केलेली साडेचार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद संपली आहे.
याशिवाय नगरसेवकांनी सादर केलेली आणखी २ कोटींची बिले द्यायची असल्याने या बिलांसाठी वर्गीकरणाद्वारे दोन कोटींचा निधी देण्यास नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
बाणेर येथे महापालिकेडून कॅन्सर युनिटसाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या निधीतून हे वर्गीकरण देण्यात आले आहे. औषधोपचारांच्या स्व-खर्चाची बिले व पॅनेलवरील हॉस्पिटलची बिले दिली जाणार आहेत. या योजनेअंतर्गत महापालिकेच्या सुमारे २ ते अडीच हजार माजी नगरसेवकांना वैद्यकीय उपचाराचा लाभ दिला जातो.
बिलांबाबत संशयाची स्थिती
या योजनेत महापालिकेकडून पॅनेलवरील मोठ्या रुग्णालयांत मोफत उपचाराची सुविधा दिली आहे. त्यानुसार नगरसेवकांनी उपचार घेतल्यानंतर महापालिका संबधित रुग्णालयांना बिल देते. मात्र, काही नगरसेवकांकडून उपचारानंतर बिले दिली जातात. काही नगरसेवक प्रत्येक तीन महिन्यांनी औषधांची बिले पाठवतात. त्यात अनेक बिले काॅस्मेटिक साहित्यांपासून सौदर्य प्रसाधनांची असल्याचेही काही प्रकार आहेत. मात्र, प्रशासनाकडून त्यावर काहीच आक्षेप घेतला जात नाही. काही नगरसेवकांनी चक्क आपल्या उपचाराच्या बिलात लहान मुलांच्या औषधांचीही बिले दिल्याचे प्रकार घडत आहेत. काही नगरसेवक उपचाराचे एकही बिल न देता वर्षभर फक्त औषधांची बिले देत आहेत.