पुणे, (संजय कडू) समाजातील गुन्हेगारी रोखण्याचे काम पोलिसांचे असते. मात्र, समाजाचा हातभार त्यासाठी नसेल तर ते कोणालाही शक्य होत नाही. “आपला समाज, आपली जबाबदारी’ ही जाणीव समाजात निर्माण होत नाही तोपर्यंत ते शक्य होणार नाही हे कटू वास्तव पुणे पोलिसांनी स्वीकारले आहे. त्यामुळे पोलिसांच्या कामात सामाजिक सहभाग वाढवण्याच्या अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. “तुम्ही जागा सूचवा, आम्ही गस्त घालू’ हा उपक्रम या संकल्पनेतून नव्याने उदयाला येत आहे. नागरिकांनी त्यांच्या परिसरात पोलिसांची गस्त कोठे आवश्यक आहे हे सुचवायचे. तेथे स्थानिक पोलीस ठाण्याचे कर्मचारी भेट देऊन पाहणी करतील. गरज असेल तर नियमित गस्त घालण्याची ही योजना आहे. पोलिसांच्या या आवाहनाला 15 दिवसांत नागरिकांनी तब्बल 300 ठिकाणे गस्तीसाठी सुचवली. यातील 100 ठिकाणी प्रत्यक्षात गस्तही सुरू झाली आहे. पुण्याच्या विस्तारासोबत गुन्हेगारीही वाढली आहे. विशेषत: उपनगरांमध्ये गुन्हेगारांचे नवे अड्डे तयार होत आहेत. मात्र, स्थानिक पोलिसांचे पेट्रोलिंग अद्याप पारंपरिक पद्धतीने सुरू होते. गस्तीची वर्षानुवर्षे तीच ती ठिकाणे होती. त्यात बदलाचा प्रयत्नच झाला नव्हता. परिणामी गुन्हेगारांवर हवा तसा वचक बसत नव्हता. पोलिसांचा वचक कमी झाल्यामुळे अनेक मिशीही न फुटलेली युवक गुन्हेगारीकडे वळत आहेत. त्यांना वेळीच सावरणे आवश्यक असल्याने सामाजिक सहभागाचे महत्त्व अधोरेखखित झाले. हे लक्षात घेऊन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सर्वसामान्य नागरिकांची गरज लक्षात घेऊन पेट्रोलिंगचे स्पॉट निश्चित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एक व्हॉट्सऍप नंबर प्रसिद्ध करून नागरिकांना पेट्रोलिंगचे ठिकाण सूचवण्याचे आवाहन केले होते. ‘क्यू आर कोड’लाही फाटा कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांची सार्वजनिक ठिकाणी उपस्थिती महत्त्वाची असते. त्यामुळे अनेक गुन्ह्यांना आळा बसतो. पोलिसांची जरबही राहते. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी तसेच चारचाकी वाहनांतून ठराविक तासाच्या अंतराने पेट्रोलिंग केले जाते. पेट्रोलिंग व्यवस्थित केले जाते का नाही? यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची नजर असते. संबंधित कर्मचाऱ्यांच्या मोबाइलवरून “क्यू आर कोड’ स्कॅन करायची पद्धती मागील काही वर्षांत सुरू करण्यात आली होती. पेट्रोलिंगच्या स्पॉटवर “क्यू आर कोड’ लावले होते. कर्मचाऱ्याला प्रत्यक्षात तेथे जाऊन मोबाइलवर ते स्कॅन करावा लागत होता. मात्र, काही महिन्यांतच कामचुकार पोलिसांनी यावरही उपाय शोधून काढला. “क्यू आर कोड’ची कॉपी करून ती खिशात ठेवली जाऊ लागली. कार्यालयात बसूनच पेट्रोलिंगच्या टाइमला “क्यू आर कोड’ स्कॅन केला जात होता. यामुळे प्रत्यक्षात कर्मचारी पेट्रोलिंगच्या स्पॉटवर न जाताही तो गेल्याचे दिसत होते. यावर पर्याय म्हणून नवी जीपीएस पद्धत कार्यरत करण्यात आली आहे. त्यानुसार पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे प्रत्यक्षात उपस्थिती जीपीएसद्वारे मुख्य नियंत्रण कक्षाला दिसणार आहे. महिलांना दिलासा कोंढवा येथील एका सार्वजनिक शौचालयाच्या परिसरात महापालिकेच्या वतीने कोणत्याच प्रकारे विजेचे खांब बसवले नसल्याने अंधार असायचा. येथे येणाऱ्या महिलांची छेडछाड अंधारात दडून बसलेली टपोरी करत होते. यामुळे महिला व मुलींना शौचालयात जाताना नेहमी भीती वाटत होती. महिलांनी पोलिसांना पेट्रोलिंगसाठी हे ठिकाण सूचवल्यावर तेथे पेट्रोलिंग सुरू झाले. यामुळे टपोरी पोरांकडून होणारा पाठलाग बंद होऊन महिलांना दिलासा मिळाला. त्यांनी पोलीस दलाचे आभार मानले. पोलिसांनी 9145003100 हा व्हॉट्सऍप नंबर प्रसिद्ध केला आहे. लोकांनी गस्त घालण्याचे ठिकाणाचे व्हॉट्सऍप मेसेजरवर लोकेशन पाठवावे. पोलिसांना घटनास्थळी गस्त का आवश्यक आहे याचे स्पष्टीकरण द्यावे आणि नंतर पोलीस घटनास्थळाचा अभ्यास करतील. गरज भासल्यास घटनास्थळी गस्त सुरू केली जाईल. – अभिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे