आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर कारवाई – आयुक्त नवल किशोर राम पुणे – महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतरही शहरात अनेक राजकीय पक्षांच्या इच्छुकांकडून मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या सहली, लकी ड्राॅ, भेटवस्तूंच्या वाटपांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, या कार्यक्रमांसाठी लावण्यात आलेल्या जाहिरात फलकांमध्ये आपला राजकीय पक्ष, नेत्यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे अशा कार्यक्रमांसाठी होणारा खर्च संबंधित पक्षाच्या खर्चात धरला जाणार आहे. तसेच, अशा कार्यक्रमांना महापालिकेची परवानगी घेतलेली नसल्यास संबंधित इच्छुकांवर आचारसंहिताभंगाची कारवाई केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. तसेच, शहरातील अनधिकृत बोर्ड, बॅनर्स तसेच पोस्टर तसेच राजकीय व्यक्तींच्या संबधित फलक ४८ तासांच्या आत काढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी निवडणूक संनियंत्रण समिती गठित करण्यात आली आहे. या समितीत पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांचा समावेश करण्यात आला आहे. निवडणुकीच्या काळात घडणाऱ्या महत्त्वाच्या घटना, प्रचार फेऱ्या, सभा तसेच उमेदवारांच्या खर्चाबाबत व्हिडीओग्राफी सर्व्हेलन्स पथक तयार करण्यात आले आहे. तसेच भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. मतदारांना प्रलोभने किंवा प्रभाव पाडणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी चेक पोस्ट पथक तयार करण्यात आले आहेत. तर शहरात मतदारांना प्रलोभने दाखविणारे कार्यक्रम झाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. म्हणून पक्षाच्या खर्चात समावेश महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, एखाद्या व्यक्तीला कोणताही कार्यक्रम घ्यायचा असल्यास त्याने आचारसंहितेच्या काळात महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे. हा कार्यक्रम मतदारांना प्रलोभने दाखविणारा असला तर त्याला परवानगी दिली जाणार नाही. तसेच, संबंधित व्यक्तीने अर्ज भरण्यापूर्वी हा खर्च केलेला असल्याने त्याच्या निवडणूक खर्चात तो समाविष्ट करता येणार नाही. मात्र, त्याच वेळी जर राजकीय पक्षाच्या बॅनरखाली हा कार्यक्रम झालेला असेल तर तो त्या पक्षाच्या नावावर टाकला जाईल. तसेच संबंधित व्यक्ती उमेदवार म्हणून अर्ज भरण्यास आल्यास त्याच्या खर्चात तो खर्च समाविष्ट केला जाईल.