पुणे – आयआयएमपीला स्वायत्त महाविद्यालयाची मान्यता

पुणे – श्री चाणक्‍य एज्युकेशन सोसायटीच्या इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, पुणे अर्थात “आयआयएमपी’ला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) स्वायत्त महाविद्यालय म्हणून मान्यता मिळाली आहे. यानुसार “आयआयएमपी’ हे सन 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून पासून 10 वर्षांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेले स्वायत्त महाविद्यालय राहील.

संस्था यंदा रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत असून या निर्णयामुळे संस्थेच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. यामुळे संस्था आता अधिक नावीन्यपूर्ण आणि उद्योगाभिमुख अभ्यासक्रम आणू शकेल. तसेच नवीन प्रकारच्या अध्यापन व मूल्यांकन पद्धतीही अवलंबिण्याची संधी मिळेल. रोजगारक्षम व औद्योगिक क्षेत्रात काम करण्यासाठी सज्ज करणाऱ्या शिक्षणामुळे येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्‍चित आमूलाग्र बदल जाणवेल. याबरोबर विद्यार्थ्यांना पदवी ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचीच मिळणार आहे, असे आयआयएमपीचे संचालक डॉ. पंडित माळी यांनी सांगितले. ठराविक काळाने अभ्यासक्रमात आवश्‍यक ते बदल होणे ही काळाची गरज आहे.

स्वायत्ततेमुळे दरवर्षी अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन करून त्यात समकालीन अभ्यासक्रमांचा समावेश करणे शक्‍य होईल. लवकरच बिझनेस ऍनालिटिक्‍स, डेटा ऍनालिटिक्‍स, आदरातिथ्य सेवा आणि पर्यटन सेवाविषयक प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचे संस्थेचे नियोजन आहे, असेही डॉ. माळी यांनी सांगितले.

श्री चाणक्‍य एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत अध्यक्षा डॉ. तरिता शंकर व समूह संचालक प्रा. चेतन वाकलकर यांच्या नेतृत्वाखाली सन 1994 मध्ये आयआयएमपीची स्थापना करण्यात आली. सध्या आयआयएमपीतर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न एमबीए अभ्यासक्रम व एआयसीटीई मान्यताप्राप्त पीजीडीएम हा स्वायत्त अभ्यासक्रम राबविला जात आहे. येथील एमबीए अभ्यासक्रमास तीन वेळा एनबीएची (नवी दिल्ली) मान्यता मिळाली आहे. तसेच सीईटी प्रवेश परीक्षांच्या कट ऑफच्या दृष्टीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एमबीए महाविद्यालयांमध्ये आयआयएमपीच्या एमबीए अभ्यासक्रमाचा दुसरा क्रमांक लागतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.