पुणे : मान्सूनच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जिल्ह्यासह विभागात पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे भाज्यांचे नुकसान झाले असून, तोडणीही थांबली आहे. त्यामुळे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक घटली आहे. दुसरीकडे ग्राहकांकडून भाज्यांना मागणी वाढली असल्याने बहुतांश प्रकारच्या भाज्यांच्या भावाने शंभरी ओलांडली आहे. भाज्यांच्या भावात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली. मार्केट यार्डातील भाजीपाला विभागात इतर वेळी राज्य आणि परराज्यातून दररोज ९० ते १०० ट्रक भाज्यांची आवक होते. मात्र, सध्या ही आवक १० ते २० ट्रकनी कमी झाली आहे. भाज्यांची आवक कमी आहेच; शिवाय भिजलेल्या आणि दर्जाहीन मालाचे प्रमाणही लक्षणीय आहे. भिजलेला माल लवकर खराब होत असल्याने किरकोळ विक्रेत्यांकडूनही मालाची बेताने खरेदी करण्यात येत असल्याचे या वेळी सांगण्यात आले. पावसामुळे फळभाज्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस आवक कमीच राहणार आहे. परिणामी भाज्यांचे वाढलेले भाव कायम राहणार आहेत. – अमोल घुले, माजी उपाध्यक्ष, आडते असोसिएशन भाज्यांचे किरकोळ बाजारातील किलोचे दर गवार १२० ते १३० शेवगा १०० ते १२० मटार १२० ते १६० दोडका १०० ते १२० भेंडी १०० ते १२० सिमला मिरची १०० ते १२० मेथीची जुडी ७० रुपयांना पावसाला सुरुवात झाली, की दरवर्षी पालेभाज्यांचे मोठे नुकसान होते. परिणामी आवक घटत असते. तशीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे. त्यामुळेच पालेभाज्यांचे भाव वाढले आहे. बुधवारी किरकोळ (दि. ४) बाजारात मेथीच्या जुडीची ६० ते ७० रुपयांना विक्री करण्यात आली आतापर्यंतचा हा उच्चांकी दर असल्याचे किरकोळ बाजारातील विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले.