राज्य मंडळाच्या अध्यक्षपदी त्रिगुण कुलकर्णी यांची नियुक्ती पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी यशदाच्या उपमहासंचालक त्रिगुण कुलकर्णी यांची बदलीद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेशही राज्य शासनाने जारी केले आहेत. शालेय शिक्षण विभागात आयएएस अधिकाऱ्यांचा शिरकाव दिवसेंदिवस वाढत चालला असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. यामुळे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झाल्याची चर्चाही रंगू लागली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये शालेय शिक्षण विभागाची भ्रष्ट कारभारामुळे बदनामी झालेली आहे. शैक्षणिक गुणवत्ताही फारशी सुधारलेली आढळत नाही. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना योग्य वेळी त्या त्या कालावधीत पदोन्नत्या दिल्या गेल्या नाहीत. त्यामुळे संचालक, अध्यक्ष पदे रिक्त राहिली. त्या पदांचा अतिरिक्त कार्यभारही अन्य अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आला. या अतिरिक्त कार्यभारामुळे अनेक अधिकाऱ्यांची डोकेदुखीही अनेकदा वाढल्याचे आढळून आहे. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्याकडे राज्य मंडळाच्या अध्यक्ष पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. तो अतिरिक्त कार्यभार आता संपुष्टात आला आहे. त्यातच शासनाने शालेय शिक्षण विभागात आयएएस अधिकाऱ्यांना एंट्री देण्याचा नवा पायंडाच पाडला आहे. गेल्या काही वर्षांत शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद राज्य प्रकल्प संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद संचालक, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अध्यक्ष अशा एकूण चार पदावर आयएएस अधिकारी कार्यरत आहे. त्यात आता राज्य मंडळाच्या अध्यक्षपदी त्रिगुण कुलकर्णी या आयएएस अधिकारी यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे आता शालेय शिक्षण विभागात एकूण पाच आयएएस अधिकाऱ्यांचा भरणा झालेला आहे. आयएएस अधिकाऱ्यांमुळे शैक्षणिक गुणवत्ता सुधारली का? शालेय शिक्षण विभागात आयएएस अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी त्यांच्या नियुक्त्या केल्या जातात की, शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी नियुक्त्या केल्या जातात याबाबत मोठे प्रश्न चिन्हच निर्माण होत आहे. आयएएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमुळे खरंच शिक्षण विभागात आमूलाग्र बदल झालेत का? याबाबतही राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने आत्मचिंतन करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे.