पुणे – महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपच्या बालेकिल्ला असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघातील पेठांसह, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात प्रभाग रचनेत भाजपच्या दिग्गजांना एकमेकां समोर यावे लागणार आहे. तर उपनगरांमध्ये अनेक दिग्गजांसाठी प्रभाग रचना सोयीची झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, प्रत्यक्षात, प्रभाग रचने नंतर ओबीसी आणि महिला आरक्षणाची सोडत निघाल्यानंतर कोण सुपात आणि कोण जात्यात हे स्पष्ट होणार आहे. महापालिकेची प्रभाग रचना जाहीर होण्या आधीच सोमवारी प्रभागांची नावे पालिकेच्या संकेतस्थळावर व्हायरल झाल्याने या राजकीय चर्चांना शहरात सोमवारी उधाण आले होते. त्यात, राष्ट्रवादी तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रभाग रचना आपल्याच पक्षाला सोयीची असल्याचे सांगण्यात येत होते. त्याच वेळी, शिवसेना आणि कॉंग्रेसच्या अनेकांकडून मात्र, प्रभागांच्या नावांवरून रचनाही तशीच असल्या आमच्यात पक्षात तिकिटांसाठी मारामार होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
महापालिकेची प्रभाग रचना आज जाहीर होणार आहे. त्यामुळे सर्व इच्छूकांनी देव पाण्यात ठेऊन प्रभाग कसा असेल याची वाट पाहिली जात होती. त्यातच, दोनच दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने शहरातील 58 प्रभागांची यादी तसेच त्यांची लोकसंख्या जाहीर केलेली होती. मात्र, या प्रभागांना कोणतेही नाव दिलेले नव्हते. त्यामुळे, मंगळवारी प्रभाग रचनेचा पडदा उघडणार असल्याने सर्व इच्छूकांची धाकधुक सुरू असतानाच प्रभागांची नावे व्हायरल झाली.
परिणामी, संभाव्य प्रभाग कसा असेल याचा अंदाज सर्वच इच्छूकांना आला. त्यामुळे कोण कोणत्या प्रभागात जाणार आणि कोणाचा प्रभाग फुटला, कोणाला फटका बसला, कोणाचा पत्ता कट होणार आणि कोण कोणासमोर येणार याची गणिते बांधत राजकीय चर्चांना उधान आले होते.
मात्र, ही प्रभागांची नावे खरी निघाल्यास शहराच्या गजबजलेल्या पेठांमध्ये सत्ताधारी भाजपचे अनेक नगरसेवकांना तिकिटासाठी झगडावे लागणार आहे. त्याच, पेठांमधील प्रभाग बहुतांश स्वरूपात पूर्वीच्या प्रभागा एवढेच असले तरी या निवडणूका तीन सदस्यांच्या वॉर्ड ने होणार असल्याने अनेक नगरसेवकांना इतर प्रभागात बस्तान बसवावे लागणार आहे. मात्र, त्याच वेळी त्यांना पक्षाच्या विद्यमान नगरसेवकांचाही विचार करावा लागणार असल्याने तिकिटासाठी झगडावे लागणार आहे.
29 प्रभागांमध्ये दोन महिला…
प्रभाग रचनेचा अंदाज आला असला तरी तीन सदस्यांच्या प्रभागांमध्ये आरक्षणाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणानंतर प्रभागांची गणिते बदलणार आहेत. त्यातच, महिलांसाठी 50 टक्के आरक्षण असल्याने जवळपास 173 मधील 87 जागा महिलांसाठी आरक्षित असल्याने 29 प्रभागांमध्ये दोन महिला उमेदवार असणार असून त्यात, आरक्षणानंतर आणखी गणिते बदलणार आहेत. त्यामुळे, प्रभाग रचनेवरून कोण सुपात-कोण जात्यात हे स्पष्ट होणार आहे. तर आरक्षणामुळे अनेक विद्यमानांना आपल्या घरातील महिलांना संधी द्यावी लागणार आहे.
उपनगरांमध्ये सर्वाधिक नगरसेवक
महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 34 गावांमध्ये बहुतांश गावे ही पूर्व, पूर्वोत्तर आणि दक्षिण भागातील आहेत. त्यामुळे हडपसर, वडगावशेरी आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघासह पुरंदर मतदारसंघातील गावांमध्ये 173 मधील तब्बल 103 नगरसेवक असणार आहेत. तर उर्वरीत भागात 100 नगरसेवक असणार आहेत. परिणामी, उपनगरांमध्ये सर्वच राजकीय पक्ष जोर लावणार असल्याचे चित्र असले तरी, या भागात विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादीचा आमदार निवडून आले असून खडकवासला विधानसभा मतदारसंघात अवघ्या दिड हजारांच्या मताधिक्यांने राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून या भागात ताकद पणाला लावण्यात आली आहे. तर या मतदारसंघात काही भाग कॉंग्रेस तसेच शिवसेनेचे प्राबल्य असल्याने महाविकास आघाडीकडून या भागावर लक्ष केंद्रीत केले जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र, लोकसभा निवडणूकीत या सर्व ठिकाणी भाजपलाही मोठे मताधिक्य असल्याने भाजपलाच त्याचा फायदा होईल असा दावाही केला जात आहे.