पुणे – फरार कालावधीत माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याला आश्रय देणाऱ्या वकिलाला पोलिसांनी गजाआड केले आहे. ऍड. सागर संजय म्हस्के (32, रा. म्हस्के वस्ती, कळस, आळंदी रोड) असे त्याचे नाव आहे. त्याने आळंदी येथील घरात आश्रय दिल्याची माहिती समोर आली आहे. त्याला कट रचून खंडणी उकळणे, धमकाविणे, सावकारी कायदा, हत्यार बाळगणे तसेच ऍट्रॉसिटीच्या हडपसर पोलिसांत दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. दि. 2 सप्टेंबर 2020 रोजी आरोपी विशाल ढोरे व इतर 12 आरोपींनी रो हाऊस मालमत्ता जबरदस्तीने हडपण्यासाठी कट रचला होता. फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना इजा पोहोचविण्यासाठी व गंभीर दुखापत करण्याची तसेच ठार मारण्याची भीती घालून फिर्यादीचे व त्यांच्या पत्नीचे फोटो व अंगठे जबरदस्तीने घेतले. त्या आधारे रो हाऊस हडपण्यासाठी बनावट दस्त बनविले. तसेच अनधिकृत सावकारी करून 60 टक्के व्याजाने फिर्यादीला कर्ज दिले. तसेच जातीवाचक भाष्य केल्याबाबत गुन्हा दाखल झाला होता. बऱ्हाटेवर शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात 12 हून अधिक गुन्हे दाखल असून गेल्या वर्षाभरापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. तसेच सामाजिक माध्यमांचा वापर करून पोलिसांना देखील वेठीस धरत होता. त्याला नुकताच महिनाभरापूर्वी अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीमध्ये त्याला कळस येथे राहणाऱ्या ऍड. सागर म्हस्के याने त्याला आश्रय दिला होता, असे समोर आले. म्हस्के हा फरार झाला होता. तेव्हापासून गुन्हे शाखेची पथके त्याच्या मागावर होती. याच दरम्यान तो देवदर्शनासाठी फिरत असल्याचेही पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत समोर आले होते. दरम्यान, म्हस्के हा त्याच्या राहत्या घरी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख करीत आहेत.