Pune : पुण्यातील पंधरा प्रभागात पक्षाला उमेदवारी मिळावी

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीने एकत्रित लढवाव्यात, अशी आपल्या पक्षाची भूमिका आहे. पुणे महापालिका निवडणुकीत किमान १५ प्रभागात आपल्या पक्षाला उमेदवारी मिळावी. संपूर्ण पाच वर्षासाठी पक्षाला उपमहापौरपद मिळावे आणि मागास प्रवर्गाचे आरक्षण आल्यास महापौर पद मिळावे, अशा आपल्या मागण्या आहेत, अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली. यावेळी पक्षाचे राज्य सचिव बाळासाहेब जानराव, प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर, शहराध्यक्ष संजय सोनवणे, गंगाधर आंबेडकर, सूर्यकांत वाघमारे असित गांगुर्डे , शैलेंद्र चव्हाण, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, मोहन जगताप, महिपाल वाघमारे, शाम सदफुले, संदीप धांडोरे, लियाकट शेख, रवी अवसरमल, अक्षय अवसरमल, उमेश कांबळे, आकाश बहुले आदि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री आठवले म्हणाले की, मागण्यांसदर्भात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी आपली चर्चा झाली असून आपल्या मागण्यांना योग्य प्रतिसाद मिळेल, अशी आशा आहे. त्याचप्रमाणे आगामी काळात विविध महामंडळे, जिल्हा नियोजन मंडळावरील नियुक्त्यामध्येही पक्षाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी आमची मागणी आहे.





