पुणे – करोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी असून, त्यावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी सांगितले.
करोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या अतिशय कमी आहे. पहिल्या डोस घेणाऱ्यांची संख्या शहरातील एकूण लसीकरणाला पात्र असलेल्या नागरिकांच्या सुमारे 70 टक्के आहे. परंतु, दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ही 22 ते 25 टक्क्यांच्याच घरात आहे. त्यामुळे त्यांचा दुसरा डोस पूर्ण करण्यावर आता लक्ष केंद्रीत करणार असल्याचे डॉ. भारती यांनी सांगितले.
पहिला डोस झालेल्यांची संख्या 21 लाखांच्याही पुढे गेली आहे, तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संक्य अद्याप आठ ते साडेआठ लाखांच्या पर्यंतच आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहीम वेगाने राबवणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्यांचे पहिले डोस झाले आहेत त्यांना प्राधान्याने दुसरा डोस देणे हे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे ते डोस वाढवण्यात येणार असल्याचे डॉ. भारती यांनी नमूद केले.
याशिवाय ज्या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये बाधितांची संख्या वाढत आहे, तेथे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवण्यासंदर्भातील सूचना दिल्या आहेत. प्रत्येक शुक्रवारी सगळ्या क्षेत्रीय आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वेळोवेळी या सूचना देत आहोत. तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करताना करोनाची लक्षणे असलेली व्यक्ती आढळल्यास तातडीने आरटीपीसीआर करावे, अशाही सूचना दिल्याचे डॉ. भारती यांनी सांगितले.