पुणे : लोहगाव येथील नवीन विमान टर्मिनल खुले झाले आणि प्रवाशी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील आर्थिक वर्षात पुणे विमानतळ येथून एक कोटी पाच लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रवास करणाऱ्यांची संख्या १०.६६ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामध्ये डिसेंबर २०२४ हा महिना सर्वाधिक प्रवासी वाहतुकीचा ठरला असून, ज्यामध्ये ९ लाख ५४ हजार प्रवाशांनी पुणे विमानतळाचा वापर केला. त्यामध्ये ९ लाख २० हजार देशांतर्गत आणि ३३ हजार ३३७ आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा समावेश होता. पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल विकसित करून विमान उड्डाणे सुरू झाली. तर जुन्या टर्मिनलचा विकास सुरू करण्यात आला आहे. सध्या विमानतळावरून दररोज जवळपास दोनशे विमांनाच्या फेऱ्या होतात. नवीन टर्मिनल सुरू झाल्यानंतर काही नवीन शहर जोडण्यात आली आहेत. त्यामुळे प्रवासी संख्या वाढत आहे. गेल्या आर्थिक वर्षात यामुळेच प्रवासी संख्येत वाढ झालेली दिसून येत आहे. २०२३-२४ च्या तुलनेत अकरा टक्क्यांजवळ प्रवासी संख्या वाढली आहे. त्यामध्ये सर्वाधिक प्रवासी हे देशांर्तंग प्रवास करणारे आहेत. चौकट नवीन विमानसेवा आणि विस्तारित नेटवर्क पुणे विमानतळावरून प्रवासी वाढविण्यासाठी विमानतळ प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. गेल्या आर्थिक वर्षात नवीन देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्ग सुरू केले. त्यामध्ये पुणे-दुबई आणि पुणे-बँकॉक थेट आंतरराष्ट्रीय सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच, भोपाळ, त्रिवेंद्रम, चेन्नई, इंदौर, अहमदाबाद आणि देहरादून यांसारख्या देशांतर्गत शहरांसाठी नवीन उड्डाणे सुरू झाली.