पुणे – पीएमपीएमएल प्रशासनाने प्रवाशांना सवलतीचे पास उपलब्ध करुन दिल्याने आणि त्यासंदर्भात प्रवाशांमध्ये जनजागृती केल्याने पासचा व्यवसाय तेजीत आला आहे. त्यामुळे सध्याची पास केंद्रे अपुरी पडू लागली आहेत, ही बाब लक्षात घेऊन पास केंद्राची संख्या वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. येत्या महिनाभरात त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
गेल्या काही वर्षांच्या कालावधीत पीएमपीएमएल प्रशासनाच्या प्रवासी संख्येत झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे प्रशासनाचा महसूल झपाट्याने कमी होत चालला होता. यावर उपाय म्हणून प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी प्रवाशांना सवलतीच्या दरात पास देण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला होता. त्यानुसार ज्येष्ठ नागरिकांसह, अन्य प्रवासी, विद्यार्थी, अपंग आणि अंध व्यक्तींना सवलतीच्या दरात पास देण्यात येत आहेत. महिन्याच्या प्रवासाचा पास अवघ्या 1,500 रुपयांमध्ये तसेच दैनंदिन पासही सवलतीच्या दरात मिळत असल्याने अनेक प्रवासी या पास योजनेलाच महत्त्व देत आहे. विशेष म्हणजे या पासच्या माध्यमातून पुणे आणि पिंपरी-चिंचवड या महापालिकांच्या हद्दीत प्रवास करणे शक्य असल्याने अनेक प्रवाशांनी या पासला पसंती दिली आहे, त्यामुळे प्रशासनाला या पासच्या माध्यमातून दररोज तब्बल 60 लाख रुपयांचा महसूल मिळत आहे.
हे पास वितरीत करण्यासाठी प्रशासनाने शहर आणि पिंपरी-चिंचवड शहरात 39 केंद्रे सुरु केली आहेत, त्याशिवाय बसमध्येही वाहकांकडे हे पास उपलब्ध असून ऑनलाइनही हा पास घेणे आता शक्य झाले आहे. मात्र, प्रवाशांच्या मागणीच्या तुलनेत या पास केंद्रांची संख्या खूपच अपुरी आहे. त्यामुळे या पास केंद्राची संख्या आणखी वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, त्याची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती पीएमपीएमएलच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे यांनी दिली.