– प्रभाग क्र. १८, १९, ४१ मधून एकुण ८० अर्ज – प्रभाग क्र. ३८ व ४० मधून १०४ अर्ज कोंढवा – कोंढवा-कौसरबाग प्रभाग क्र. १९, उंड्री-महंमदवाडी प्रभाग क्र. ४१ व कोंढवा-येवलेवाडी प्रभाग क्र. ४० मधील सर्वपक्षीय उमेदवारांसह अपक्षांनी वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयात आज शेवटच्या दिवशी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. अनेक निष्ठावंतांना व माजी नगरसेवकांना तिकिट न मिळाल्याने जिकडे एबी फॉर्म मिळेल तिकडे पळापळ सुरू होती, त्यामुळे सर्वच प्रभागात मोठी बंडखोरी झाल्याचे दिसून आले. भाजप आणि शिवसेना (शिंदे) यांची युती ऐनवेळी फिस्कटल्याने एबी फॉर्म साठी उमेदवारांची धावपळ उडाली. प्रभाग क्र. १९ मध्ये सोमवारपर्यंत राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्हावर निवडणूक लढविणारे उमेदवार ऐनवेळी तुतारी चिन्हावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले. प्रभाग क्र.१८, १९, ४१ मधून एकुण ८० उमेदवारी अर्ज दाखल झाले. प्रभाग क्र. ३८ व ४० मधून १०४ अर्ज दाखल झाले. युती आणि आघाडीच्या निर्णयातील विलंबामुळे राजकीय पक्षांच्या इच्छुकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. परिणामी, अखेरच्या दिवशी बंडखोरी झाली. शिवसेना (शिंदे), शिवसेना (ठाकरे), भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार), राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (शरद पवार), महाराष्ट्र नवनिर्माण सेना,राष्ट्रीय कॉंग्रेस, एमआयएम या प्रमुख राजकीय पक्षांसह मोठ्या प्रमाणात अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. शेवटच्या काही तासांत संभावित पक्षांची उमेदवारी मिळण्याची चिन्हे न दिसताच तत्काळ दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी मिळवत अनेकांनी आपली दावेदारी मांडली. प्रभागात आता चौरंगी, पंचरंगी, बहुरंगी देखील लढत होऊ शकते. आता, ३ जानेवारीपर्यंत कोण माघार घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रत्येक जण आपल्या विजयाचे आकडेमोड करू लागला आहे. अर्ज माघारीसाठी ३ जानेवारीपर्यंत मुदत आहे. यानंतर खऱ्या अर्थान निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. राजकीय पक्षांना बंडखोरी थोपवणे तसेच एकच उमेदवार देण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. मात्र, ऐनवेळी तिकीट कापल्याने मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे, त्यामुळे या निवडणूकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. दरम्यान, मोठ्या प्रतीक्षेनंतर निवडणुकांना मुहूर्त लागला आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्याही वाढली आहे.