पुणे : शहर आणि परिसरात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाता. त्यानिमित्त होळीसाठी लागणार्या गोवर्या, ऊन, एरंडीचा डहाळा, विविध प्रकारची फुले, नारळ आदी साहित्याने बाजारपेठ सजली आहे. उद्या (गुरूवारी) होळी असल्याने साहित्य खरेदीसाठी मार्केटयार्डसह महात्मा फुले मंडईत बुधवारी (दि.१२) ग्राहकांची गर्दी झाली होती. उपनगर आणि जिल्ह्याच्या विविध भागातून शहरात मोठ्या संख्येने गोवर्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. मागील वर्षी एका गोवरीचा दर 5 ते 7 रूपये होता. यंदा त्यात वाढ झाली आहे. यावेळी एका गोवरीचा दर 10 रूपये आहे. एका ऊसाचा दर 20 ते 30 रूपये, एरंडीचा डहाळा 10 रूपये, नारळ 25 ते 30 रूपये, नागीलीची दहा पाने 10 रूपये, खारीक, खोबरे, सुपारी, बदामचे पॉकीट 10 ते 15 रूपये, हळंदी, कुंकाचे पाकीट प्रत्येकी 10 रूपये, कापूर कॅकीट 20 रूपये, अगरबत्ती पुडा 10 ते 200 रूपये, कापसाच्या वाती 10 रूपये, नैसर्गिक तुप 50 ते 200 रूपये, विविध प्रकारची फुले व हार मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध झाले आहेत. सार्वजनिक मंडळे, सामाजिक संस्था आणि सोसायट्यांत होळी पेटविली जाते. त्यामुळे दरवर्षी गोवर्यांना मोठी मागणी असते. त्यामुळे उपनगरासह जिल्ह्यातील गोवर्या विक्रेते मागणी लक्षात घेवून त्या तयार करून ठेवत असतात. शहरातील काही विक्रेते होळीच्या आधीच गोवर्याची मागणी करून ठेवत असतात. त्यामुळे होळीच्या आदल्या दिवशी मोठ्या प्रमाणात गोवर्या विक्रीसाठी बाजारात दाखल होत असतात. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत गोवर्या, ऊस, एरंडीचा डहाळा आणि नारळाच्या दरात वाढ झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. डमरू, डफलीला मागणी होळीच्या दिवशी लहान मुले डमरू आणि डफली वाजवत असतात. त्यामुळे हे साहित्यही बाजारात मोठ्या दाखल झाले आहे. 50 ते 200 रूपये डमरूची किंमत आहे, तर डफळीचा दर 100 ते 200 रूपये आहे. विशेषत: होळी पेटवत असताना मुले डफली वाजवून त्याचा आनंद घेत असतात. डमरू आणि डफलीच्या दरातही मागील वर्षीच्या तुलनेत 10 ते 20 रूपयांनी वाढ झाली असल्याचे महात्मा फुले मंडईतील विक्रेत्यांनी सांगितले.