पुणे – मोबाइल व्हॅनमध्येच कोपरा सभा

पुणे – उमेदवारांच्या प्रचारांसाठी शहरात फिरविल्या जाणाऱ्या प्रचाररथ (मोबाइल व्हॅन) मध्येच कोपरा सभा घेतल्या जात आहेत. या व्हॅनला पोलिसांची परवानगी असल्याने यामध्ये होणाऱ्या सभेसाठी वेगळ्या परवानगीची आवश्‍यकता नसल्याचे राजकीय पक्षांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोपरा सभांसाठी येणारा खर्च तसेच घ्याव्या लागणाऱ्या परवान्याच्या अटीतून या प्रकाराद्वारे सुटका करून घेतली जात आहे.

शहराची लोकसंख्या जवळपास 20 लाखांच्या वर असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात कोपरासभा घेण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, प्रत्येक पक्षाकडून सरासरी 100 ते 200 सभा होतील असा दावा करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ 65 सभांनाच परवानगी मागण्यात आली आहे. तर प्रत्येक सभेचा खर्च हा साडेसात हजार असल्याने तसेच परवाने मिळण्यास विलंब होत असल्याने राजकीय पक्षांकडून प्रचाररथाचा वापर करून कोपरा सभेच्या खर्चातून पळवाट काढण्यात आली आहे. या प्रचार रथावर एकावेळी सात ते आठ जणांना बसता येईल, अशी व्यवस्था आहे. त्यामुळे गर्दीची ठिकाणे निवडून अथवा मोकळी जागा निवडून त्या ठिकाणी हे प्रचाररथ उभे केले जात आहेत. तसेच त्या ठिकाणी दहा ते 20 मिनिटांची सभा घेतली जात आहे. प्रामुख्याने प्रचार फेरी संपताना, मोकळ्या जागा शोधून अशा सभा घेतल्या जात आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात या सभांना मान्यता घेणे आवश्‍यक असताना या नियमाला हरताळ फासला जात आहे.

दरम्यान, याबाबत कोपरा सभांची परवानगी देणाऱ्या महापालिकेकडे विचारणा केली असता, त्यांनी हात वर केले असून ही बाब जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारीत येत असल्याचे सांगितले आहे. तर निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारच्या सभेबाबत नियमात संधिग्धता असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.