भारतीय हवामानशास्त्र विभागाची माहिती पुणे : मान्सून परतून महिना झाला त्यामुळे थंडीची चाहुल लागणार असे वाटत असताना, राज्यातील कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्रात मागील दोन आठवड्यापासून अवकाळी पावसाने धुमाकुळ घातला आहे. गेल्या ४८ तासांत तर काही जिल्ह्यांमध्ये मध्यम तर जोरदार सरींनी पिकांचे नुकसान केले असून, जनजीवन विस्कळीत केले आहे. दरम्यान, पुढील ४८ तासांत राज्यातील पावसाचा जोर ओसरेल, कोकण-गोव्यातील काही ठिकाणी तर उर्वरीत राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील आणि लगतच्या भागावरील असलेले कमी दाबाचे क्षेत्र, समुद्र सपाटीपासून ३.१ किमी उंचीवर असलेली चक्रीय हवा कायम आहे. तसेच पूर्व मध्य आणि इशान्य अरबी समुद्रावर असलेले ठळक कमी दाबाचे क्षेत्र, समुद्रसपाटीपासून ५.८ कि.मी. चक्रीय हवा कायम आहे. पुढील २४ तासांत ते पूर्व इशान्य दिशेने दक्षिण गुजरात आणि उत्तर महाराष्ट्र किनाऱ्याकडे सरकण्याची शक्यता असून, त्याची तीव्रता कमी होवून कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. आज दिवसभरात कोकणातील बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम ते जोरदार सरी पडल्या. विशेषत: पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक जिल्ह्याचा घाट विभागात ३० ते ४० ताशी वेगाने वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी झाल्या. तर ठाणे, रायगड, नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक जिल्ह्याच्या उर्वरीत भागात मेघगर्जनेसह पाऊस झाला. दरम्यान, पुढील २४ तासांत पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता असल्याने कोकण-गोव्यातील काही जिल्ह्यात तर उर्वरीत राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडतील, त्यामुळे कोणत्याही जिल्ह्याला यलो अलर्ट दिलेला नाही.