उपनगरांतील पश्चिम व आसपासच्या भागातही गारठा पुणे – शहरासह उपनगरातील किमान तापमानात किंचित वाढ झाली असली, तरी थंडीचा काडाका कायम आहे. विशेषत: उपनगरांतील पश्चिम व आसपासच्या भागात कडाक्याची थंडी जाणवत आहे. त्यामध्ये एनडीए, पाषाण, औंध, कोथरूड, वारजे, खडकवासला, धायरी, जांभूळवाडी, नांदेडसिटी आणि कात्रज परिसरात थंडीचा जोर आहे. पूर्व भागासह आसपासच्या परिसरातील किमान तापमान १२ अंशांच्या पुढे आहे. पुणे शहरातील हवेली परिसरात सर्वात कमी ७.५, तर शिवाजीनगर येथे ८.१ आणि पाषाण परिसरात ८.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. बारामती येथे ८.७, दौंड, माळीण आणि आंबेगाव येथे ८ ते ९ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंद झाली. त्यामुळे या परिसरात हुडहुडी भरणारी थंडी असून, आठवडाभरापासून थंडीचा जोर कायम असल्याने यंदा डिसेंबर महिना चांगलाच गारठला आहे. गेल्या ४८ तासात कमाल तापमानात एक ते दोन अंशाने वाढ झाल्यामुळे दुपारी हवामान कोरडे आणि उन्हाचा चटका जाणवत आहे. कोरेगाव पार्क आणि तळेगाव येथे कमाल तापमान ३० अंशांच्या पुढे गेले असून, अन्य शहरातही कमाल तापमानात वाढ झाल्यामुळे दुपारी उन्हाचा चांगलाच चटका जाणवत आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यात थंडीचा जोर कायम राहील. कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार नसून, हवेली, पाषाण, शिवाजीनगर आणि जिल्ह्यातील काही भागात थंडीचा पारा एक आकडी राहणार असल्याने कडाक्याची थंडी आणि धुक्यांचे प्रमाण अधिक असणार आहे, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. शहर, जिल्ह्यातील किमान तापमान हवेली ७.५, शिवाजीनगर ८.१, पाषाण ८.६, बारामती ८.७, दौंड ८.९, माळीण आणि आंबेगाव ९.७, तळेगाव १०.१, कुरवंडे आणि हडपसर ११.२, निमगिरी १२.३, कोरेगाव पार्क १३.३, चिंचवड १४.५, वडगावशेरी १५.५, मगरपट्टा १५.६ अंश सेल्सिअस.