Pune: छोट्या पण सातत्यपूर्ण प्रयत्नांतून लोकांच्या जीवनात बदल घडतो. गृहनिर्माण सोसायट्यांनी ऊर्जा बचत, कचरा व्यवस्थापन, स्वच्छता मोहीम यांसारखे पूरक उपक्रम व फलदायी प्रयत्न केल्यास त्याचा शहर पर्यावरणावर मोठा सकारात्मक परिणाम होऊ शकेल, असे आवाहन पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी गृहनिर्माण सोसायटी व नागरिकांना केले आहे. ‘माय सोसायटी, माय व्हॅलेंटाईन’ या स्पर्धेतील विजेत्या सोसायट्यांचा सन्मान – रोहन बिल्डर्सतर्फे ‘क्लीन अॅण्ड ग्रीन मोहिमे’च्या अनुषंगाने कंपनीकडून उभारण्यात व हस्तांतरित करण्यात आलेल्या निवासी प्रकल्पांमधील पर्यावरण पूरकता, सुरक्षितता आणि चांगली जीवनशैली व त्याच्या व्यवस्थापनासाठी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या ‘माय सोसायटी, माय व्हॅलेंटाईन’ या स्पर्धेतील विजेत्या सोसायट्यांचा सन्मान करण्यात आला, त्यावेळी आयुक्त नवल किशोर राम बोलत होते. या अभिनव स्पर्धा उपक्रमाचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ बंड गार्डन स्थित हॉटेल शेरेटन ग्रँड येथे शनिवारी पार पडला. मागील दोन दशकांत स्थापन झालेल्या जुन्या तसेच नव्या रोहन बिल्डर्सतर्फे उभारण्यात आलेल्या सोसायट्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. या समारंभाला पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाच्या सचिव मनीषा कोष्टी आणि संचालिका मृद्गंधा जोशी, रोहन बिल्डर्सचे संचालक संजय लुंकड, अभिषेक भटेवरा आणि अश्विन लुंकड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रोहन बिल्डर्सच्या वतीने या उपक्रमामागील भूमिका मांडताना सेल्स व मार्केटिंग विभागाच्या जनरल मॅनेजर पूजा भागवत म्हणाल्या की, गृहप्रकल्पांची उभारणी व घरांचा ताबा दिल्यानंतर आमची जबाबदारी संपत नाही. सोसायट्यांनी कार्यक्षम आणि जबाबदार पद्धतीने काम करावे, नवनवीन कल्पना राबवाव्यात यासाठी आम्ही सातत्याने मार्गदर्शन आणि सहकार्य करतो. या उपक्रमाद्वारे आदर्श आणि पर्यावरणपूरक नागरी जीवनाचे उत्तम उदाहरण निर्माण करणाऱ्या सोसायट्यांचा सन्मान करण्यात येत आहे. या स्पर्धेचे परीक्षण ३० वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या ज्येष्ठ आर्किटेक्टस् व इंजिनिअर्सचा समावेश असलेल्या मंडळाकडून करण्यात आले. विविध पर्यावरणपूरक उपक्रम, सौर ऊर्जेचा वापर, कचरा व्यवस्थापन, स्वच्छता, सुरक्षा उपाययोजना आणि सुशासन या निकषांवर आधारित हे परीक्षण करण्यात आले. या सोसायट्यांनी पटकवला सन्मान – या स्पर्धेत ‘सोसायटी ऑफ द इयर’ हा मुख्य पुरस्कार रोहन मिथिला – १ या सोसायटीला प्रदान करण्यात आला. तसेच रोहन निलय आणि रोहन गरिमा या सोसायट्यांना देखील सन्मानित करण्यात आले. विशेष उपक्रम पुरस्कारासाठी रोहन तरंग, रोहन क्रितिका आणि रोहन अभिलाषा या सोसायट्यांची निवड करण्यात आली, तर ‘रायझिंग स्टार’ श्रेणीत इतर निवडक सोसायट्यांचा गौरव करण्यात आला.